डहाणू-नाशिक मार्गाचा उल्लेख नाहीमेमूच्या फेऱ्यांतही वाढ नाही
By admin | Published: February 26, 2015 11:08 PM2015-02-26T23:08:14+5:302015-02-26T23:08:14+5:30
केंद्रिय रेल्वेमंत्री मुंबईकर असल्याने त्यांना येथिल लाखो उपनगरीय प्रवाशांच्या समस्यांची चांगली जाण असेल, अशी वसई-विरार पट्टयातील लाखो प्रवाशांना अपेक्षा होती
ठाणे : केंद्रिय रेल्वेमंत्री मुंबईकर असल्याने त्यांना येथिल लाखो उपनगरीय प्रवाशांच्या समस्यांची चांगली जाण असेल, अशी वसई-विरार पट्टयातील लाखो प्रवाशांना अपेक्षा होती, मात्र त्या सा-यांची घोर निराशा झाली असून त्यांच्या तोंडाला पाने पुसली गेल्याचे गुरुवारी सादर झालेल्या अर्थसंकल्पातून स्पष्ट झाले. या प्रवाशांमध्ये बजेटमध्ये ठेंगा दाखवल्याची भावना आहे.
यावेळी देखिल या भागातील प्रवाशांना सापत्न वागणूक मिळाल्याच्या संतप्त प्रतिक्रिया प्रवाशांमधून व्यक्त झाल्या. प्रभूंनी विरार-डहाणूसाठी ३.५ हजार कोटींची तरतूद केलेली असली तरीही एमयुटीपी फेज-३ मधून त्याची पूर्तता कधी होणार याचा कालावधी मात्र स्पष्ट केलेला नाही. सध्या येथे दुहेरी मार्ग असून ही सुविधा आल्यास चार मार्ग होेतील, त्यानंतर या ठिकाणी इमयू लोकल धावण्यास सुरुवात होणार आहे, तो पर्यंत मात्र या ठिकाणाहून डेमूच गाड्या धावणार असल्याने या प्रवाशांमध्ये नाराजी आहे. अद्यापही या ठिकाणच्या स्थानकांमध्ये स्वच्छतागृहे नाहीत, बाकडी नाहीत, इंडीकेटर्ससह उद्घोषणा यंत्रांची अद्ययावत सुविधा नाही, या मुलभूत गरजाही भागवल्या जात नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे. दिवा येथून सुटणा-या डेमू गाड्या दिवसातून केवळ चार वेळा धावतात, त्या फे-यांमध्येही वाढ करण्यात आलेली नाही. या ठिकाणच्या डेमू रेक्समध्येही वाढ नाही. त्यातच नुकतेच नव्याने आलेल्या डेमू रेक्सला जुने डबे जोडण्यात येणार आहेत, त्या ऐवजी जूना रेकही चालवावा फे-या वाढवाव्यात ही प्रवाशांची अपेक्षा होती, मात्र त्यावर सपशेल पाणी फिरवले गेले. तिकिट खिडक्यांचा आभाव, आॅल टाइम तिकिट व्हेंडींग यंत्रे नाहीत, सीव्हीएम असून कुपन नाहीत अशी अवस्था असल्याने नेमके किती प्रवासी येथून तिकिट काढतात हे निश्चित नाही, त्यामुळेच येथून लाखो प्रवासी प्रवास करत असले तरीही त्यांच्या योगदानाची गणना होत नसल्याचे या बजेटवरुन स्पष्ट होत आहे.दिवा-वसई या मार्गाला सबर्बनचा दर्जा देण्यात आला, परंतू त्या सुविधा मात्र देतांना रेल्वे प्रशासन हात आखडता घेत असल्याचे आजच्या बजेटवरुन स्पष्ट झाले.