Join us

मुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेत हस्तक्षेप नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2020 6:33 AM

उच्च न्यायालय । तयारीसाठी परीक्षा एक महिना पुढे ढकलण्यासंदर्भातील याचिकादारांची मागणी फेटाळली

मुंबई : मुंबईविद्यापीठाच्या बीए, बीकॉम आणि बीएसस्सीच्या अंतिम वर्षाच्या आॅनलाइन परीक्षा येत्या १ आॅक्टोबरोपासून सुरू होत आहेत. उच्च न्यायालयाने परीक्षांच्या वेळापत्रकात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने याचिकादार विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठाच्या उपकुलगुरूंना परीक्षा पुढे ढकलण्यासंदर्भात निवेदन करण्याची परवानगी दिली. सचिन मांवडकर (४३) बीएच्या अंतिम वर्षाला आहेत, तर दिलीप रणदिवे (५३) यांनी एलएलबीच्या तीन वर्षांच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतला आहे. परीक्षेची तयारी करण्यासाठी किमान एक महिना मिळावा. त्यामुळे एक महिना परीक्षा पुढे ढकलण्याचे निर्देश मुंबई विद्यापीठाला द्यावेत, अशी विनंती या दोघांनी याचिकेद्वारे केली.

आपली बाजू मांडण्यासाठी या दोघांनी जून, २०१९ मध्ये मुंबई विद्यापीठाने काढलेले परिपत्रक सादर केले. महाविद्यालयांनी किमान एक महिना आधी परीक्षांचे वेळापत्रक सादर करावे, असे या परिपत्रकात नमूद आहे. मुंबई विद्यापीठातर्फे रुई रोड्रिग्स यांनी न्यायायलाय सांगितले की, हे परिपत्रक अंतिम वर्षांच्या परीक्षांना लागू होत नाही. यंदा कोरोनामुळे आॅनलाइन परीक्षा घेण्यात येणार असून, त्या १ आॅक्टोबरपासून सुरू होतील. बॅकलॉग परीक्षांना शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे, तर विद्यापीठाने विद्यार्थ्यांना तयारीसाठी पुरेसा वेळ दिला. यंदा केवळ परीक्षांची पद्धत बदलली नाही, तर स्वरूपही बदलले आहे. प्राध्यापकांनाही प्रश्नपत्रिका तयार करण्यास पुरेसा वेळ दिलेला नाही. विद्यार्थ्यांचे भविष्य दावणीला आहे. त्यामुळे अभ्यासासाठी त्यांना पुरेसा वेळ द्यायला हवा, असे याचिकादारांची वकील शेरॉन पाटोळे यांनी न्यायालयाला सांगितले.उपकुलगुरूंना निवेदन देण्याचे निर्देशशैक्षणिक प्रकरणांत न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास कमी संधी असते. त्यामुळे याचिका मागे घ्या आणि उपकुलगुरूंपुढे निवेदन सादर करा, असे निर्देश उच्च न्यायालयाने याचिकादारांना दिले. त्यानुसार, याचिकादारांनी याचिका मागे घेत उपकुलगुरूंना निवेदन सादर करण्याची तयारी दर्शविली.

टॅग्स :मुंबईविद्यापीठ