जव्हार पंचायत समितीच्या आमसभेचे निमंत्रण नाही
By Admin | Published: June 25, 2015 11:30 PM2015-06-25T23:30:37+5:302015-06-25T23:30:37+5:30
पंचायत समितीमार्फत होणाऱ्या आमसभेच्या नियोजनात पत्रकारांना निमंत्रणच दिले नसल्यामुळे तालुका पत्रकारांनी याचा निषेध केला आहे
जव्हार : पंचायत समितीमार्फत होणाऱ्या आमसभेच्या नियोजनात पत्रकारांना निमंत्रणच दिले नसल्यामुळे तालुका पत्रकारांनी याचा निषेध केला आहे. तसेच या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी जव्हार तालुक्यातील पत्रकारांनी केली आहे.
बुधवारी आमसभेचे नियोजन समिती जव्हारमार्फत केले जाते. या आमसभेचे अध्यक्ष आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा होते तसेच पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सुरेखा थेतले, पंचायत समितीचे सभापती, उपसभापती, इतर पदाधिकारी उपस्थित होते. या आमसभेबाबत कुठलीच सूचना, अजेंडा अथवा निमंत्रण पत्रकारांना दिले नसल्याने जव्हार तालुक्यातील सर्व पत्रकारांनी प्रशासनाच्या हलगर्जीपणाला जबाबदार धरत निषेध व्यक्त केला आहे.
जव्हार पंचायत समितीवर भाजप-शिवसेना अशी युती आहे. तसेच या आमसभेबाबत इतर कुठल्याही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रण दिले जात नाही. त्यामुळे ही आमसभाही फक्त भाजप-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांपुरतीच असते. म्हणजे आपलीच माणसे प्रश्न विचारणार अन् आपलीच माणसे उत्तरे देणार, मग इतरांनी काय करायचे, असा प्रश्न नागरिकांनी केला आहे.
पत्रकारांना बोलावल्याने शासनाचे पितळ उघडे पडेल, या भीतीने पत्रकारांना डावलण्यात आल्याची चर्चा आहे. यापूर्वीही पत्रकारांना कुठल्याही आमसभेचे निमंत्रण नसल्याची धक्कादायक बाबही उघडकीस आलेली आहे. त्यामुळे जव्हार तालुक्यातील पत्रकारांनी बुधवारच्या आमसभेचा निषेध करत दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. (वार्ताहर)