मुंबईत आघाडी नाहीच
By admin | Published: January 14, 2017 07:24 AM2017-01-14T07:24:07+5:302017-01-14T07:24:07+5:30
सर्वच राजकीय पक्षांनी मुंबई महापालिका निवडणूक प्रतिष्ठेची बनवली आहे. कोणी ताकद वाढली म्हणून स्वबळाचे नारे देतोय तर
मुंबई : सर्वच राजकीय पक्षांनी मुंबई महापालिका निवडणूक प्रतिष्ठेची बनवली आहे. कोणी ताकद वाढली म्हणून स्वबळाचे नारे देतोय तर कोणी मित्रपक्षाची ताकदच नसल्याचे सांगत ‘एकला चलो रे’चा नारा देतोय. युती-आघाडीचा हा घोळ सुरू असतानाच मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी मात्र मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी अशक्य असल्याचे विधान केले आहे.
धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी टाळण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी करावी अशी भूमिका दोन्ही पक्षांतील नेत्यांनी अलीकडेच व्यक्त केली. यावर राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषदांमध्ये आघाडी झाली तरी चालेल; पण कोणत्याही परिस्थितीत मुंबईत आघाडी होणार नाही, असे संजय निरुपम यांनी स्पष्ट केले. मुंबईसह १० महापालिका आणि २५ जिल्हा परिषदांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर युती आणि आघाडीच्या चर्चेला ऊत आला. शिवसेना, भाजपाने युतीबाबत चर्चा होणार असल्याची घोषणा केल्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादीतही तशा हालचाली सुरू झाल्या. भाजपाला रोखण्यासाठी दोन्ही पक्षांनी एकत्र येण्याची आवश्यकता मांडण्यात आली. या पार्श्वभूमीवर संजय निरुपम यांनी मात्र मुंबईत आघाडी अशक्य असल्याचे विधान केले आहे. आघाडीबाबत कोणतीही शक्यता नाही. आमच्याकडून कोणताही प्रस्ताव दिला जाणार नाही. राज्यात झाली तरी चालेल, पण मुंबईत आघाडी नको. मुंबईतील स्थानिक नेते, पदाधिकाऱ्यांनी आघाडी करू नये, असे मत मांडले होते. त्यांचे म्हणणे मी दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांसमोर मांडले आहे. वरिष्ठांकडूनही स्थानिक नेते, पदाधिकारी आघाडीचा निर्णय घेतील, असे सांगण्यात आले आहे. त्यांनीही हिरवा कंदील दिला आहे, असे निरुपम यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, युतीची चर्चा सुरू करणाऱ्या शिवसेना-भाजपावरही त्यांनी तोंडसुख घेतले. आम्ही ठरवले ते अंतिम असते. त्यांच्यासारखा आमचा स्वभाव नाही. एकमेकांना अफज़ल खान आणि निजामाचे बाप म्हणणारे आता नेमके कुणाशी चर्चा करताहेत ते स्पष्ट व्हायला हवे, असा चिमटाही त्यांनी काढला.
युती आणि आघाडीबाबत सर्वच पक्षांनी सोयीची भूमिका स्वीकारली आहे. मुंबई महापालिकेवर
कोणत्याही परिस्थितीत ‘कमळ’ फुलवायचेच, असा निर्धार भाजपाने केला आहे.
सुरुवातीला मुंबई, ठाणे आणि पुण्यात युती नकोच अशी भूमिका घेणाऱ्या भाजपाने आता मात्र मुंबईतील युतीच्या चर्चेची तयारी दर्शविली आहे. महापालिकांमध्ये युती नकोच म्हणणाऱ्या भाजपाला जिल्हा परिषदांमध्ये मात्र शिवसेनेची
सोबत चालणार आहे. तर दुसरीकडे काँग्रेसला मुंबईत राष्ट्रवादी नको असली तरी ठाणे, पुणे आणि
पिंपरी-चिंचवड आदी ठिकाणी राष्ट्रवादीची संगत चालणार आहे. (प्रतिनिधी)