गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. पहिल्यांदाच राज्यात सर्वाधिक म्हणजेच ३१ हजार ८५५ नव्या कोरोनाबाधित रूग्णांची नोंद करण्यात आली होती. तर दुसरीकडे केवळ मुंबईत ५ हजारांपेक्षा अधिक नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. मंगळवारी राज्यात २८ हजार ६९९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. तर सोमवारी राज्यात २४ हजार ६४५ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. राज्यात अनेक ठिकाणी या पार्श्वभूमीवर निर्बंधही अधिक कडक करण्यात आले आहेत. दरम्यान, मुंबई लोकल ट्रेन आणि लॉकडाऊनबाबत मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे."सध्या लॉकडाऊनचं कोणतंही वृत्त आमच्या चर्चेत नाही. आमचं लक्ष हे सध्या तीन गोष्टींवर आहे. चाचण्या वाढवणं, पायाभूत सुविधा वाढवणं आणि लसीकरणाचा वेग वाढवणं यावर आम्ही लक्ष देत आहोत. निश्चितच यात आम्हाला यश मिळेल," असा विश्वास काकाणी यांनी व्यक्त केला. "रेल्वे स्थानकांवर आम्ही पथक तयार केली आहेत. बाहेरून येणाऱ्या ज्या ट्रेन आहेत त्यासाठी आम्ही ही पथकं नेमली आहे. लोकल ट्रेन सध्या ज्या क्षमतेनं सुरू आहेत ती कायम राहिल हा आमचा प्रयत्न आहे. ती कमी करण्यावर आमचा कोणताही विचार नाही. परंतु शासकीय कार्यलयं, निमशासकीय कार्यालयं, खासगी कार्यालयांत ५० टक्के उपस्थितीत असावी. सर्वांनी या नियमाचं पालनं करावं, जेणेकरून लोकलमध्ये होणारी गर्दी काही प्रमाणात कमी होईल," असंही ते म्हणाले. कोरोना महासाथीपासून पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात रुग्णवाढबुधवारी चोवीस तासांमध्ये मुंबईत ५ हजारांपेक्षा अधिक कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. दरम्यान, ही सर्वाधिक रुग्णवाढ असून कोरोनाच्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करण्याचं आवाहन मुंबई महानगरपालिकेनं केलं आहे. सध्या मुंबई एकून साडेतीस हजारांपेक्षा अधिक अॅक्टिव्ह केसेस असून रुग्ण बरे होण्याचा दर ९० टक्के इतका आहे. सध्या राज्यात रुग्ण दुपटीचा कालावधी ८४ दिवस असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात आली.