Join us

मुंबईकरांच्या दैनंदिन डेटा वापराचे मोजमापच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2021 4:06 AM

यंत्रणेचा अभाव; ट्राय, डाॅटकडेही नाेंदणी हाेत नसल्याचे उघडलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : इंटरनेट हा मानवाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग ...

यंत्रणेचा अभाव; ट्राय, डाॅटकडेही नाेंदणी हाेत नसल्याचे उघड

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : इंटरनेट हा मानवाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. कोरोनाकाळात त्याने आपले मूल्य संपूर्ण जगाला दाखवून दिले. भारताचा विचार करता मुंबईत इंटरनेटचा वापर सर्वाधिक होतो; पण आश्चर्याची बाब म्हणजे एका माणसाने रोज किती डेटा वापरला, याचे मोजमाप करणारी यंत्रणाच अस्तित्वात नाही.

मोबाइलद्वारे इंटरनेट वापरणाऱ्यांना त्यांच्या दैनंदिन डेटावापराबाबत माहिती मिळते; परंतु केबल किंवा अन्य वायरलेस माध्यमांद्वारे प्रतिमाणशी किती डेटा वापरला जातो, याचे मोजमाप करणे अशक्यप्राय असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. त्यामुळे ग्राहकांनी पैसे भरल्यानुसार सेवा मिळते का, स्पीड इंटरनेट सुविधेच्या नावाने फसवणूक तर होत नाही ना, हे प्रश्न अनुत्तरितच असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) आणि दूरसंचार विभाग (डॉट) या संस्था इंटरनेट वापर, पुरवठादार यांच्यावर लक्ष ठेवतात. एकूण वापरकर्ते, राज्य किंवा विभागनिहाय इंटरनेटचा वापर याविषयी नोंदी ठेवण्याचे कामही या संस्थांकडून केले जाते; परंतु एका माणसाने दिवसभरात किती डेटा वापरला, याबाबत नोंदी ठेवण्याची व्यवस्था त्यांच्याकडेही नाही. शिवाय या संस्थांकडे कर्मचाऱ्यांची संख्या खूपच कमी असल्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातील इंटरनेट वापरामागील वस्तुस्थितीचा अभ्यास करणे अवघड असल्याचे डेटा क्षेत्रातील तज्ज्ञ ॲड. कमलाकर हडकर यांनी सांगितले.

‘अनलिमिटेड प्लॅन’मागील सत्य काय?

केबलद्वारे पुरवठा होणाऱ्या इंटरनेटबाबत विचार करायचा झाल्यास अधिकृत संस्थांकडून निश्चित किंमत किंवा प्लॅन ठरविण्यात न आल्याने केबल व्यावसायिक त्याला परवडेल त्या दराने ग्राहकांना सेवा देतो. हल्ली स्पर्धा वाढल्याने ‘अनलिमिटेड प्लॅन’चे फॅड वाढले आहे. मात्र, प्लॅन अनलिमिटेड असला तरी ग्राहकाने त्याचा किती वापर केला, त्याने पैसे भरल्यानुसार इंटरनेटचा स्पीड मिळाला का, याचे मोजमाप होत नाही. टीव्हीप्रमाणे सेट टाॅप बाॅक्ससारखी व्यवस्था असल्यास प्रतिमाणशी इंटरनेट वापराचे मोजमाप करता येऊ शकते, असे मत कुर्ला येथील केबल व्यावसायिक रजनीश हिरवे यांनी मांडले.

............................