मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून राष्ट्रवादीचे काँग्रेसमध्ये विलिनीकरण होणार असल्याचा चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. राष्ट्रवादीची आज मुंबई बैठक झाली. या बैठकीत कोणत्याही परिस्थितील राष्ट्रवादीचे काँग्रेसमध्ये विलिनीकरण न करण्याचा निर्णय घेण्यात आला.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदाच शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत राष्ट्रवादीची ही बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादीचे सर्व नेते, नवनिर्वाचित खासदार, उमेदवार, पदाधिकारी आणि सर्व जिल्हाध्यक्ष उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादीचे विलिनीकरण करण्याच्या अफवा असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.
पक्ष विलीनीकरणाची बातमी ही अफवा होती. ज्यांना वाटतं की आपण मित्रांसोबत एकत्र राहू नये अशा विचारांच्या पत्रकारांना सोबत घेऊन ही बातमी मुद्दाम पसरवली गेली. ही बातमी साफ खोटी आहे. राष्ट्रवादीचे स्वतंत्र अस्तित्व आहे आणि ते अस्तित्व कायम राहील, असे शरद पवार यांनी सांगितले.
आजची निवडणुकीनंतरची परिस्थिती इतकी वाईट नाही. तुम्ही ४० लोक आहात, तुमचा ४० लोकांचा एक संच आहे. तुम्ही खंबीरपणे लढा, असे आवाहन कार्यकर्त्यांना करत शरद पवार म्हणाले, 'एक वेळ अशी होती की, आपल्यासोबतचे ५८ लोक साथ सोडून गेले होते. सभागृहात आम्ही फक्त ६ जण होतो. मात्र आम्ही मेहनत घेतली आणि पुन्हा ६० लोक सभागृहात आणले. त्यात सर्व नवे चेहरे होते.'
लवकरच राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहे. लोकसभा निवडणुकीत काय निकाल लागले ते डोक्यातून काढा. आपला पक्ष लोकांच्या प्रभावीपणे समोर कसा येईल, आपली विचारधारा लोक आपलीशी कशी करतील, हाच विचार करा, त्यासाठी प्रयत्न करा. आपण लोकसभा निवडणुकांप्रमाणे विधानसभेतही तरुण चेहऱ्यांना संधी देऊ, असेही शरद पवार यांनी यावेळी सांगितले.
याचबरोबर, कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कोणत्याही पक्षात विलीन होणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे स्वतःचे एक अस्तित्व आहे, हे अस्तित्व पार्टी कायम ठेवणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे राष्ट्रवादीचे विधिमंडळ पक्षनेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
जनता लोकसभेला वेगळा विचार करत असते आणि विधानसभेला वेगळा विचार करत असते. महाराष्ट्रातही विधानसभा निवडणुकीत लोक वेगळा विचार करतील आणि या सरकारला खाली खेचतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पराभव हा पराभव असतो पण त्याने खचून जायचे नसते, पुन्हा लढायचे असते, असेही अजित पवार म्हणाले.
विधानसभेबाबत जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप ठरला नाही. निवडणूक काँग्रेससोबत एकत्र लढवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. निवडणुकांसाठी १०० दिवस राहिले आहेत. या निवडणुकीत तरूणांना अधिकाधिक संधी देणार, पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन विजयाचे लक्ष्य समोर ठेवणार आहे, असे जयंत पाटील यांनी सांगितले.