समाजात संगणक शिक्षित आणि अशिक्षित अशी दरी नको : शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:10 AM2021-03-13T04:10:09+5:302021-03-13T04:10:09+5:30

मुंबई : संगणक शिक्षित आणि संगणक अशिक्षित अशा प्रकारची दरी समाजात ठेवता कामा नये. साक्षरतेची चर्चा आता वेगळ्या दृष्टीने ...

There is no need for computer educated and uneducated people in the society: Sharad Pawar | समाजात संगणक शिक्षित आणि अशिक्षित अशी दरी नको : शरद पवार

समाजात संगणक शिक्षित आणि अशिक्षित अशी दरी नको : शरद पवार

Next

मुंबई : संगणक शिक्षित आणि संगणक अशिक्षित अशा प्रकारची दरी समाजात ठेवता कामा नये. साक्षरतेची चर्चा आता वेगळ्या दृष्टीने व्हायला हवी. ज्ञानाच्या कक्षा वाढत असून, त्याचा फायदा नव्या पिढीला मिळाला पाहिजे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी व्यक्त केले.

राज्याचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीदिनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात आयोजित कार्यक्रमात पवार बोलत होते. यावेळी ज्येष्ठ अणुशास्रज्ञ अनिल काकोडकर, जलसंपदामंत्री जयंत पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, उत्पादन शुल्क आणि कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार सुप्रिया सुळे, अरुण गुजराथी, शरद काळे उपस्थित होते. संगणक शिक्षण क्षेत्रातील विशेष कामगिरीसाठी विवेक सावंत यांना २०२० सालाचा यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी पवार म्हणाले की, आज घरोघरी संगणक पोहोचले आहेत. पण एक काळ असा होता, जेव्हा संगणक अनेकांना परिचित नव्हता. पुण्यात सी-डॅकची स्थापना झाल्यानंतर डॉ. भटकर आणि त्यांचा संच काम करत होता, त्यात सावंत होते. संगणकाची क्रांती सुरू झाली होती. संगणकाचे ज्ञान विस्तारित स्वरूपात आणण्याची आवश्यकता होती. या कार्यात सावंत यांचा प्रमुख सहभाग होता. सावंत यांच्या सहकार्याने तत्कालीन शिक्षणमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एमकेसीएलची स्थापना झाली. आज सावंत यांचे कार्य केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित राहिले नाही तर ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचले आहे. आज बिहारसारख्या राज्यात आणि गल्फ देशातही एमकेसीएलचे काम पोहोचले आहे, असे पवार म्हणाले.

नाशिककरांमध्ये बाहेरून आलेल्यांना मोठे करण्याची किमया : पवार

विवेक सावंत यांचा जन्म नाशिकचा असला तरी त्यांचे कुटुंब मूळचे कोकणातले. कुसुमाग्रज यांचे संबंध आयुष्य नाशिकमध्ये गेले, त्यांचा जन्म मात्र पुण्यातला. एखाद्या व्यक्तीचे गुण उजळून काढण्यात नाशिकचा वाटा आहे, असे मला वाटते. आज आपण ज्यांची जयंती साजरी करत आहोत त्या यशवंतराव चव्हाण साहेबांनादेखील दिल्लीत बिनविरोध पाठविण्याचे काम नाशिकने केले होते. नाशिककर हे बाहेरून आलेल्या लोकांना मोठे करण्याचे काम करतात, अशी मिश्कील टिपण्णीही पवार यांनी यावेळी केली.

Web Title: There is no need for computer educated and uneducated people in the society: Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.