देशातील ५५ पैकी फक्त ५ मॉलचे काम पूर्ण
मुंबई : कोरोना दाखल होण्यापूर्वी २०२० साली देशभरात २ कोटी २२ लाख चौरस फुट क्षेत्रफळ असलेले ५५ मॉल सुरू होतील असा अंदाज होता. मात्र, कोरोना संक्रमणामुळे या मॉल उभारणीचा डोलारा कोसळला आहे. जेमतेम २७ लाख चौरस फुट क्षेत्रफळ असलेले पाच मॉल या वर्षभरात सुरू करणे शक्य झाले आहे. दिल्ली, गुरूग्राम, बंगळूरू आणि लखनौ या शहरांतले हे माँल असून त्यात सर्वाधिक मॉल्सचे शहर अशी ख्याती अललेल्या मुंबईतील एकाही मॉलचा समावेश नाही हे विशेष !
गेल्या दशकभरात मॉल संस्कृती भारतात रुजली असून महानगरांपाठोपाठ छोट्या शहरांमध्येसुध्दा मॉलचे जाळे विस्तारू लागले आहेत. त्यामुळेच २०२० साली देशात विक्रमी संख्येने मॉलची उभारणी होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. देशातील ५५ पैकी १ कोटी ४६ लाख चौरस फुटांचे ३५ मॉल हे देशातील सात प्रमुख महानगरांमध्ये उभारले जात आहेत. तर, उर्वरित २० माँलचे बांधकाम हे व्दितीय आणि तृतिय श्रेणीतल्या शहरांमध्ये सुरू आहे. ही कामे २०२० मध्ये पूर्ण होतील आणि मॉलचे कामकाज याच वर्षी सुरू होतील असा अंदाज होता. परंतु, हे अंदाज कोरोनामुळे चुकल्याची माहिती अँनराँक प्राँपर्टीज या सल्लागार संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून पुढे आली आहे.
कोरोनाचा प्रचंड मोठा फटका रिटेल क्षेत्राला बसला आहे. त्यामुळे माँलमधिल जागा भाडे तत्वावर घेण्याचे प्रमाण कोरोनामुळे लक्षणीयरीत्या घटले आहे. परिणामी माँल उभारणीच्या कामांना ब्रेक लागल्याची माहिती अँनाराँकचे सीईओ अनुज केजरीवाल यांनी दिली. प्रतीक्षेत असलेल्या उर्वरित मॉलचे भवितव्य एक वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी लांबणीवर पडले आहे.
येत्या वर्षी मुंबईत ६ नवे मॉल
बांधकाम सुरू असलेले किंवा रखडपट्टी झालेले १४ मॉल २०२१ पर्यंत पूर्ण होतील. त्यांचे एकूण क्षेत्रफळ ५९ लाख चौरस फूट असेल. त्यापैकी सर्वाधिक १६ लाख चौरस फूट क्षेत्रफळ असलेले ६ मॉल देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत उभे राहणार असून त्याखालोखाल तीन मॉल बंगळूरू येथे उभारले जात असल्याची माहिती या सर्वेक्षणातून पुढे आली आहे.