मुंबई- भाजपानं शिवसेनेला राज्यसभेतील एका मोठ्या पदाची ऑफर दिल्याची मीडियात जोरदार चर्चा होती. परंतु राज्यसभेतील शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या बातमीतील हवाच काढून घेतली आहे. आम्हाला भाजपाकडून अशा प्रकारची कोणतीही ऑफर नाही आणि अशी ऑफर आलीच तर ती आम्ही स्वीकारणार नाही, असा खुलासा संजय राऊत यांनी केला आहे. राज्यसभेचे उपसभापती पी. जे. कुरियन यांचा कार्यकाळ लवकरच संपुष्टात येणार असून, ते पद काहीही करून शिवसेनेला मिळवून देण्यासाठी भाजपा प्रयत्नशील असल्याचीही चर्चा आहे. गेल्या 41 वर्षांपासून हे पद काँग्रेसकडे आहे. परंतु संख्याबळाच्या जोरावर भाजपा हे पद शिवसेनेला मिळवून देण्यास उत्सुक असल्याचं बोललं जातंय.राज्यसभेत संख्याबळाच्या बाबतीत नंबर वन असलेल्या पक्षाला हे पद काहीही करून विरोधकांकडे जाऊ द्यायचं नाही. हे मानाचं पद शिवसेनेला देण्यास भाजपा तयार असल्याचीही चर्चा होती. तसेच असा प्रस्ताव 'मातोश्री'वर पाठवल्याचा दावाही भाजपानं केला होता. परंतु भाजपाचा हा दावा संजय राऊत यांनी फेटाळून लावला आहे. तसेच आम्हाला अशा प्रकारचा कोणतीही मिळालेला नाही, असा खुलासा त्यांनी केला आहे.राज्यसभेत शिवसेनेचे तीन सदस्य आहेत. संजय राऊत, राजकुमार धूत आणि अनिल देसाई यांच्यात संजय राऊत सर्वात अनुभवी आहेत. त्यामुळे शिवसेनेनं भाजपाचा प्रस्ताव स्वीकारल्यास या मानाच्या पदावर त्यांची वर्णी लागू शकते, अशीही चर्चा होती. शिवसेनेने प्रस्ताव नाकारल्यास हे पद भाजपा स्वतःकडेच ठेवेल. त्यांनी भूपेंद्र यादव यांचं नाव जवळपास निश्चित केल्याचं समजतं.
भाजपाकडून कुठलीही ऑफर नाही, आली तरी स्वीकारणार नाही- संजय राऊत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2018 6:54 PM