मुंबईः काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी उपस्थितांना संबोधित केलं आहे. ते म्हणाले, आताच्या काळात भाजपाशिवाय पर्याय नाही. आजचा दिवस माझ्यासाठी ऐतिहासिक आहे, आर्टिकल 370 सारखी कलम हटवण्याचं महत्त्वाचं काम केंद्रातील भाजपा सरकारनं केलं आहे.100 दिवसांत पंतप्रधानांनी धाडसी निर्णय घेतले. मी नेहमीच सकारात्मक विचारांनी राजकारण केलं आहे. विनाअट मी भाजपामध्ये प्रवेश केला असून, पक्ष माझ्यावर जी जबाबदारी टाकेल ती मी पार पाडीन. 20 ते 25 वर्षांत काम करताना आम्हीसुद्धा अनेक माणसे जोडलेली आहेत. जुन्या कार्यकर्त्यांना सन्मानानं वागवायचं आहे. जनतेनं मला खूप दिलेलं असल्यानं मला आणखी काही नको. युती सरकारचं या मतदारसंघावर लक्ष असावं यासाठीच भाजपामध्ये प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री आणि भाजपा सरकारचं न्याय देऊ शकेल.
पाटील यांच्या भाजपा प्रवेशाने आजपर्यंत इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस व हर्षवर्धन पाटील यांच्यातला सुप्त संघर्ष आता उघड उघड पाहायला मिळणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना इंदापूर तालुक्यातून मदत मिळावी यासाठी राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी हर्षवर्धन पाटील यांची मनधरणी केली होती. या बदल्यात राष्ट्रवादीने इंदापूरची जागा काँग्रेसला सोडावी असे ठरले होते. त्यानुसार हर्षवर्धन पाटील यांनी सुळे यांना मदत केली. यामुळे त्यांना सर्वाधिक मताधिक्य तालुक्यातून मिळाले. मात्र, विधानसभेच्या निवडणुकीचे पडघम वाजताच राष्ट्रवादी इंदापूरची जागा सोडण्याच्या मनस्थितीत नव्हती. यामुळे हर्षवर्धन पाटील यांची अस्वस्थता वाढली होती.
इंदापूर विधानसभा मतदार संघांचे पाटील यांनी सलग 4 वेळा आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले आहे. यामध्ये सलग 3 वेळा अपक्ष आमदार म्हणून निवडून येण्याचा विक्रम देखील पाटील यांच्या नावावर आहे. मुख्यमंत्री मनोहर जोशी व उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या युती शासनात 5 वर्षे व त्यानंतर आघाडी शासनात सलग 14 वर्षे मंत्री म्हणून काम पाहिले आहे. त्यांनी एकूण 6 मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम केले आहे.