लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मालाडच्या पी उत्तर विभागातील मढ, मनोरी आणि मार्वे परिसरात अनधिकृतपणे तयार करण्यात आलेल्या ''ग्राऊंड प्लस थ्री''वर केली जाणारी तोडक कारवाई रोखण्याचे निर्देश पालिका मुख्यालयातून देण्यात आल्याचे काही राजकारण्यांकडून सांगितले जात आहे. मात्र, यात तथ्य नसून असे कोणतेही आदेश देण्यात आले नसल्याचे पी उत्तर सहाय्यक आयुक्त कार्यालयाकडून शुक्रवारी स्पष्ट करण्यात आले.
कोळी समाज राहात असलेल्या परिसरात तीन ते चार मजले तयार करत ते ४० ते ४५ लाखांना विक्री केल्याचे उघड झाले आहे. त्यानुसार पी उत्तरचे सहाय्यक आयुक्त मकरंद दगडखैर यांनी हे अनधिकृत बांधकाम तोडण्यास सुरुवात केली आहे. ही कारवाई रोखण्यात यावी, अशी मागणी करण्यासाठी पश्चिम उपनगरचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांची भेट घेतली. तेव्हा काकाणी यांनी या कारवाईवर स्थगिती आणल्याची अफवा काही राजकारणी तसेच स्थानिकांकडून पसरवत लोकांची दिशाभूल केली जात असल्याचे पालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. असा कोणताही आदेश काकाणी यांनी दिलेला नसून, अनधिकृत कामांवर कारवाई सुरूच राहणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
मला आदेशाची प्रत दाखवा
अनधिकृत बांधकाम रोखण्यासाठी वरिष्ठांकडून मला कोणतेही आदेश आलेले नाहीत. त्यामुळे जे कोणी असा दावा करत असतील त्यांनी मला संबंधित आदेशाची प्रत दाखवावी. कारण मी अनधिकृत कामांवर माझी कारवाई सुरूच ठेवणार आहे.
( मकरंद दगडखैर - सहाय्यक आयुक्त, पी उत्तर विभाग )