Join us

रेल्वेतून पडलेल्या तरुणीवर अतिप्रसंग नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 4:08 AM

नवी मुंबई : रेल्वे रुळालगत जखमी अवस्थेत आढळलेल्या त्या तरुणीवर बलात्कार झाला नसल्याचे उघड झाले आहे. सहा दिवसांनी ती ...

नवी मुंबई : रेल्वे रुळालगत जखमी अवस्थेत आढळलेल्या त्या तरुणीवर बलात्कार झाला नसल्याचे उघड झाले आहे. सहा दिवसांनी ती शुद्धीत आल्यावर रेल्वे पोलिसांना घटनेचा उलगडा झाला. वैद्यकीय अहवालात तिच्यावर बलात्काराची शक्यता वर्तविली गेल्याने पोलिसांनी तपासावर जोर दिला होता.

वाशी-मानखुर्ददरम्यान खाडीपुलालगत सुमारे २५ वर्षीय तरुणी जखमी अवस्थेत आढळली होती. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ती रुळालगत पडली असल्याची माहिती वाशी रेल्वे पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, रेल्वे पोलिसांनी तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, डोक्यावर मार लागल्याने ती जखमी अवस्थेत होती. यामुळे सखोल तपास करून पोलिसांनी तिच्या कुटुंबीयांची माहिती मिळवून तिची ओळख पटविली होती. या दरम्यान वैद्यकीय चाचणीत तिच्यावर बलात्कार झाल्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यावरून अज्ञात व्यक्तींनी तिच्यावर बलात्कार करून रेल्वेतून फेकून दिल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली होती. त्यानुसार, अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करून तपासावर जोर दिला होता. याकरिता ट्रान्स हार्बर व हार्बर मार्गावरील रेल्वे स्थानकातील सीसीटीव्हीही तपासण्यात आले. मात्र, कसलाही सुगावा पोलिसांच्या हाती लागला नव्हता. यामुळे जखमी तरुणी शुद्धीवर येण्याची प्रतीक्षा पोलीस करत होते. अखेर सात दिवसांनी सोमवारी ती शुद्धीवर आली असता, तोल जाऊन आपण रेल्वेतून पडल्याची कबुली तिने दिल्याचे वाशी रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विष्णू केसरकर यांनी सांगितले.

ही तरुणी मुंबईची राहणारी असून, त्याच परिसरात नोकरी करणारी आहे. घटनेच्या एक दिवस अगोदर तिचे मित्रांसोबत भांडण झाले होते. यावरून ती तणावात रेल्वेतून फिरत नवी मुंबईत येत होती. या दरम्यान, ती लोकलच्या दरवाजात उभी असताना खाडीपुलालगत तोल जाऊन खाली पडली होती. मात्र, डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ती बेशुद्ध झाली होती, पण वैद्यकीय अहवालात समोर आलेल्या बाबीवरून तिच्यावर अतिप्रसंग झाल्याची शक्यता वर्तविली गेल्याने, न घडलेल्या घटनेच्या तपासावर पोलिसांना जोर द्यावा लागला.