मुंबईत खासगी वाहनांतील विनामास्क प्रवासावर दंड नाही, पालिकेचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2021 04:54 AM2021-01-18T04:54:00+5:302021-01-18T04:54:20+5:30
मुंबई महापालिकेने कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी विविध स्तरांवर कारवाई सुरू केली आहे. या कारवाईअंतर्गत सार्वजनिक ठिकाणी विनामास्क आढळणाऱ्या नागरिकांना मुंबई महापालिका दंड ठोठावित आहे.
मुंबई : खासगी वाहनांतून (प्रायव्हेट कार) विनामास्क प्रवास करणाऱ्यांना आता मुंबई महापालिका दंड ठोठाविणार नाही; तसा निर्णयच मुंबई महापालिकेने घेतला आहे, तर रिक्षा, बस अशा सार्वजनिक वाहतूक सेवांतून विनामास्क प्रवास करणारे प्रवासी मुंबई महापालिकेच्या रडावर असणार आहेत. त्यांना महापालिका दंड ठोठाविणार आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहनांतून प्रवास करताना प्रवाशांना मास्क बंधनकारक असणार असून, कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे.
मुंबई महापालिकेने कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी विविध स्तरांवर कारवाई सुरू केली आहे. या कारवाईअंतर्गत सार्वजनिक ठिकाणी विनामास्क आढळणाऱ्या नागरिकांना मुंबई महापालिका दंड ठोठावित आहे. एवढेच नाही, तर मुंबईच्या रस्त्यांहून विनामास्क प्रवास करणाऱ्यांवरदेखील मुंबई महापालिका कठोर कारवाई करत आहे. यात खासगी वाहनांतून विनामास्क प्रवास करणाऱ्या नागरिकांनादेखील मुंबई महापालिकेकडून दंड ठोठाविला जात होता. यासाठी मुंबई महापालिकेने ठिकठिकाणी क्लीनअप मार्शल तैनात केले आहेत.
मुंबईच्या मोठ्या सिग्नलवर विशेषत: खार, सांताक्रूझ, सायनसह उर्वरित ठिकाणी तैनात केलेल्या क्लीनअप मार्शलकडून दंड आकारला जात होता. विशेषत: विमानतळ प्रवासातील मोठ्या सिग्नलवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक पोलिसांसोबत उभे असलेले क्लीन अप मार्शल खासगी वाहनांसह रिक्षा, टॅक्सी, दुचाकीवर विनामास्क आढळणाऱ्या प्रवाशांवर रितसर कारवाई करत होते. मात्र आता खासगी वाहनांतून विनामास्क प्रवास करणाऱ्या नागरिकांना दंड आकारला जाणार नाही, असा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे.
समूळ उच्चाटनासाठी प्रयत्न सुरू -
मुंबई शहर आणि उपनगरात कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी प्रयत्न सुरूच आहेत. मुंबईत सार्वजनिक ठिकाणी तैनात करण्यात आलेले क्लीनअप मार्शल विनामास्क आढळणाऱ्या नागरिकांवर कारवाई करत आहेत. या शिवाय आता लसीकरण कार्यक्रमदेखील हाती घेण्यात आला आहे. सर्वसामान्य माणसापर्यंत हे लसीकरण मोहीम येण्यास अवकाश असला तरीदेखील तोवर मास्क वापरणे बंधनकारक आहे. आणि तोच कोरोनापासून वाचविण्याचा बेस्ट उपाय आहे, असा दावा सातत्याने केला जात आहे.