Join us

मुंबईमध्ये गोशाळेसाठी जागाच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 3:00 AM

गोवंश हत्याबंदीचा कायदा लागू झाल्यामुळे वृद्ध जनावरांना सांभाळणे शेतकऱ्यांना जड जाणार आहे. त्यामुळे मुंबईत दहा हजार चौरस मीटर जागा गोशाळेसाठी आरक्षित

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गोवंश हत्याबंदीचा कायदा लागू झाल्यामुळे वृद्ध जनावरांना सांभाळणे शेतकऱ्यांना जड जाणार आहे. त्यामुळे मुंबईत दहा हजार चौरस मीटर जागा गोशाळेसाठी आरक्षित ठेवण्याची मागणी भाजपाने महापालिकेच्या महासभेकडे केली होती. मात्र पालिका प्रशासनाने दुसऱ्यांदाही हा प्रस्ताव फेटाळून भाजपाला दणका दिला आहे. भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक डॉ. राम बारोट यांनी गोशाळेसाठी मुंबईत काही ठिकाणी १० हजार चौरस मीटरचे भूखंड आरक्षित ठेवण्याची मागणी ठरावाच्या सूचनेद्वारे महासभेत केली होती. ही मागणी पहिल्यांदा फेटाळल्यानंतरही बारोट यांनी माघार घेतली नाही. त्यामुळे प्रशासनाने सन २०१४-२०३४ साठी प्रस्तावित विकास आराखड्यावरील सूचना व हरकतींवर सुनावणी घेणाऱ्या नियोजन समितीच्या कोर्टात हा चेंडू भिरकावला होता. मात्र या समितीने सुनावणी व चर्चेनंतरही गोशाळेसाठी आरक्षण प्रस्तावित केले नसल्याचा अहवाल प्रशासनाने सुधार समितीपुढे ठेवला आहे.कोंडवाडे अथवा गोशाळा बांधणे हे महापालिकेचे बंधनकारक कर्तव्य नाही. त्याचबरोबर मुंबईतील तबेले शहराबाहेर स्थलांतरित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. असे या अहवालात स्पष्ट करीत प्रशासनाने या मागणीतून आपली सुटका करून घेतली आहे. विशेष म्हणजे प्रस्तावित विकास आराखड्याच्या नियोजन समितीमध्ये भाजपाचे गटनेते मनोज कोटक हेदेखील सदस्य आहेत. तरीही नियोजन समितीनेही ही सूचना स्वीकारली नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.