Join us  

आजारी कैद्यांना तपासणीला नेण्यासाठी पोलीसच नाहीत

By admin | Published: April 17, 2016 1:30 AM

पोलिसांची संख्या कमी असल्यामुळे पोलिसांवरचा कामाचा वाढता ताण सर्वश्रुत आहे. पण, याचा फटका आता आजारी कैद्यांना बसत आहे. शुक्रवारी आॅर्थर रोड कारागृहातील कैद्यांना

मुंबई : पोलिसांची संख्या कमी असल्यामुळे पोलिसांवरचा कामाचा वाढता ताण सर्वश्रुत आहे. पण, याचा फटका आता आजारी कैद्यांना बसत आहे. शुक्रवारी आॅर्थर रोड कारागृहातील कैद्यांना रुग्णालयात नेण्यासाठी पोलीस बंदोवस्त उपलब्ध नसल्यामुळे ३० ते ३५ कैद्यांची तपासणीच झाली नाही. अशाप्रकारांमुळे कैद्यांमध्ये संताप पसरत असल्याची भीती डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. आॅर्थर रोड जेलमध्ये क्षमतेपेक्षा अधिक कैदी आहेत. यातील अनेक कैद्यांना क्षयरोग, मधुमेह, हृदयरोग, मेंदूचे आजार आणि मूत्रपिंडाचे आजार आहेत. त्यामुळे त्यांची वेळेवर तपासणी करणे आवश्यक असते. आजारी कैद्यांना पोलीस बंदोवस्तात सरकारी रुग्णालायांमध्ये दररोज तपासणीसाठी नेले जाते. शुक्रवारी सुमारे ३० ते ३५ कैद्यांना जे.जे. रुग्णालय, सेंट जॉर्ज रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात येणार होते. पण, तपासणीची वेळ जवळ आली तरीही कारागृहातून एकही पोलीस उपलब्ध झाला नाही. या कैद्यांपैकी काही कैद्यांची सोनोग्राफी करायची होती. तर काहींच्या हृदयरोग आणि मेंदूच्या आजारांच्या तपासण्या करायच्या होत्या. यासाठी आधीच रुग्णालयाची वेळ घेऊन ठेवण्यात आली होती. पण, वेळ उलटूनही कैदी रुग्णालयात पोहचलेच नाही, अशी माहिती रुग्णालयातील डॉक्टरांकडून मिळाली. यातील एका कैद्याची डायलेसिसची तारीख होती. त्यामुळे या कैद्याला रुग्णालयात नेणे भाग होते. त्यामुळे कारागृहातील सुरक्षा रक्षकांसोबत त्याला रुग्णालयात नेण्यात आले.