मुंबई : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आतापर्यंत ३,९९७ प्रवाशांचे स्क्रिनिंग करण्यात आले आहे. यामध्ये १८ प्रवासी हे राज्यातील आहेत. यातील आठ प्रवाशांना खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामध्ये मुंबईतील ५ प्रवाशांना कस्तुरबा रुग्णालयात, दोघांना पुण्यातील नायडू रुग्णालयात, तर एका प्रवाशाला नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले आहे.मुंबईतील ३ प्रवाशांचे प्रयोगशालेय नमुने निगेटिव्ह आल्याचे पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्थेने (एनआयव्ही) कळविले आहे. या सर्व प्रवाशांचे नमुने एनआयव्ही, पुणे येथे पाठविण्यात आले असून, उर्वरित प्रवाशांचे प्रयोगशाळा निदान उद्यापर्यंत प्राप्त होईल. मात्र राज्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नसल्याचे मंगळवारी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.राज्य शासनाच्या आरोग्य विभागामार्फत चीन आणि विशेषकरून वुआन प्रांतातून आलेल्या प्रवाशांची विमानतळावर तपासणी केली जात आहे. १ जानेवारीपासूनच्या प्रवाशांची यादी विमानतळ प्राधिकरणाकडून घेण्यात येत असून त्यातील महाराष्ट्राचे रहिवाशी असलेल्या प्रवाशांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधण्यात येत आहे. त्यांना सर्दी, ताप वा तत्सम लक्षणे आढळली आहेत का? किंवा कुटुंबातील सदस्यांना जाणवत आहे का? याबाबत विचारणा केली जात आहे. महापालिका क्षेत्रातील अशा प्रवाशांशी पालिकेचे आरोग्य अधिकारी, तर ग्रामीण भागातील प्रवाशांना आरोग्य विभागाचे अधिकारी दूरध्वनीवरून संपर्क साधतील.विलगीकरण कक्ष कार्यान्वितराज्यात आजमितीस कोरोना व्हायरसचा धोका मोठ्या प्रमाणावर नाही. मात्र, आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्याला तोंड देण्यासाठी यंत्रणेने पूर्वतयारी केली आहे. ‘कोरोना’ रुग्णांसाठी मुंबईत कस्तुरबा आणि पुणे येथे नायडू रुग्णालयात विलगीकरण कक्ष आहेत.
राज्यात ‘कोरोना’चा एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही - आरोग्यमंत्री राजेश टोपे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2020 5:08 AM