मुंबई : सध्या संपूर्ण देशभर कोविड-19महामारीचा उद्रेक झाला आहे, अशा काळमध्ये आर्थिक परिस्थितीविषयी अनेक अफवा पसरल्याचे निदर्शनास आले आहे. सरकार निवृत्तीवेतनामध्ये कपात करणार आहे किंवा हे वेतन देणे थांबवणार आहे, अशीही एक अफवा पसरवली जात आहे. त्यावर विश्वास न ठेवण्याचा आवाहन केंद्र सरकारकडून करण्यात आले आहे. निवृत्ती वेतनधारकांनी कसलीही चिंता व्यक्त करू नये, मात्र सरकारपुढे निवृत्तीवेतनात कपात करण्याचा किंवा ते थांबवण्याचा कोणताही प्रस्ताव नाही, असे कार्मिक,सार्वजनिक तक्रार निवारण आणि निवृत्तीवेतन मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
निवृत्तीवेतनाविषयी यापूर्वीही सरकारने स्पष्टीकरण दिले आहेच. तरीही आत्ता पुन्हा एकदा सरकारने सांगितले आहे की, कोविंड -19 च्या महामारीला तोंड देण्यास सरकार समर्थ आहे. त्याला आळा घालण्यासाठी विविध उपाय योजना राबविल्या जात आहेत. त्यामुळे त्याचा फटका निवृत्त अधिकारी, कर्मचार्याना कसल्याही प्रकारे बसू दिला जाणार नाही. त्यामुळे त्याबाबतच्या कोणत्याही वृतांवर विश्वास ठेवू नये, निवृत्ती वेतनामध्ये कपात करण्याचा विचारही सरकार करीत नाही. निवृत्ती वेतनधारकांच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या निरामय आरोग्यासाठी सरकार वचनबद्ध आहे.