मुंबई : शिवसेनेची आणखी एक महत्त्वाकांक्षी योजना बंद होण्याच्या मार्गावर आहे़ बेरोजगारांसाठी आणलेली शिववडा योजना वादात अडकल्यानंतर आता शालेय पोषण आहारही अर्थसंकल्पातून गायब झाला आहे़ सुगंधित दुधाऐवजी आणलेल्या चिक्कीबाबतही गेल्या दोन वर्षांत निर्णय झालेला नाही़ त्यामुळे पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना पोषण आहाराच्या नावाखाली ठेंगाच मिळण्याची शक्यता आहे़ हा मुद्दा भाजपाने उचलून धरल्यामुळे शिवसेनेची चांगलीच पंचाईत होणार आहे़२००७ मध्ये शिवसेनेने सुगंधित दूध योजना सुरू केली़ त्यानुसार पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना दररोज सकाळी सुगंधित दूध देण्यात येत असे़ मात्र विद्यार्थ्यांना दूधबाधा होण्याचे प्रकार वाढल्यामुळे ही योजना अडचणीत आली़ अखेर दुधाऐवजी चिक्की देण्याचा निर्णय घेण्यात आला़ परंतु विद्यार्थ्यांच्या संख्येच्या तुलनेत चिक्की उत्पादन कमी असल्याने गेली दोन वर्षे पालिकेला ठेकेदार सापडलेला नाही़ त्यामुळे महापालिकेच्या सन २०१७-१८ च्या अर्थसंकल्पात पोषण आहारासाठी तरतूदच करण्यात आलेली नाही, अशी तीव्र नाराजी भाजपासह सर्वच विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी शिक्षण समितीच्या बैठकीत व्यक्त केली आहे़ तरतूदच नसल्याने विद्यार्थ्यांना पोषण आहार मिळण्याची शक्यता कमीच आहे. यावरून शिक्षण समितीच्या बैठकीत भाजपाच्या सुनीता यादव यांनी नाराजी व्यक्त केली. (प्रतिनिधी)- महापालिकेच्या शाळेत साडेचार लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत़विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार म्हणून दररोज खिचडी देण्यात येत असे़ मात्र या खिचडीच्या दर्जाबाबत प्रश्न उठविला जातो.
पोषण आहारासाठी तरतूद नाही; भाजपाकडून शिवसेनेची कोंडी
By admin | Published: April 11, 2017 3:21 AM