मुंबई: सचिन वाझे प्रकरणानंतर (Sachin Vaze Case) मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून झालेल्या उचलबांगडीनंतर परमबीर सिंह (Parambeer Singh) यांनी शनिवारी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर विरोधकांकडून अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर आज दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवार (Sharad Pawar) यांना अनिल देशमुख यांच्या भवितव्याबाबत विचारले असता त्यांनी याबाबत मोघम उत्तर देऊन वेळ मारून नेली.
अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याबाबत विचारलेल्या पत्राला उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवर पत्राच्या माध्यमातून केलेले आरोप गंभीर आहेत. मात्र याबाबत अनिल देशमुख यांचीही बाजू जाणून घेतली पाहिजे. त्यांच्या राजीनाम्याबाबत आम्ही सर्वांशी बोलून निर्णय घेऊ. याबाबतचा निर्णय हा उद्यापर्यंत होऊ शकेल. असे असले तरी याबाबतचा अंतिम निर्णय सर्वस्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच घेतील, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
शरद पवारांच्या या पत्रकार परिषदेनंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी तात्काळ भेट घेतली. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री जयंत पाटील देखील मुंबईहून दिल्लीसाठी रवाना झाले. यानंतर अजित पवार, जयंत पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यात दिल्लीत शरद पवारांसोबत बैठक पार पडली. मात्र या बैठकीत अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याबाबत चर्चा झाली नसल्याचे स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिले आहे.
अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तसेच मुंबईत मुकेश अंबानींच्या घराबाहेर कारमध्ये आढळलेली स्फोटकं आणि मनसुख हिरण यांच्या हत्ये प्रकरणी महाराष्ट्र एटीसए आणि एनआयएकडून सखोल तपास सुरू आहे. या तपासून नक्कीत ठोस माहिती समोर येईल. यातून ज्यांनी गुन्हे केले आहेत, त्यांना शोधून काढलं जाईल, असं जयंत पाटील यांनी सांगितलं.
सरकारने आता या प्रकरणी अधिक लक्ष केंद्रीत केलं आहे. विरोधकांचे आरोप हे या प्रकरणापासून लक्ष विचलीत करणारे आहेत. तसंच या मुद्यांवर येत्या दोन दिवसांत म्हणजे उद्या आणि परवा शिवसेना आणि काँग्रेस नेत्यांशी चर्चा केली जाईल, अशी माहिती देखील जयंत पाटील यांनी दिली.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी सचिन वाझे प्रकरणासंदर्भात मोठं विधान करत विरोधी पक्ष असलेल्या भाजपाला जोरदार प्रतिआव्हान दिले आहे. सचिन वाझे हा विषय आमच्यासाठी संपला आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, पोलीस आयुक्तांच्या शिफारशीशिवाय कुणालाही नोकरीवर घेतलं जात नाही. अर्थात त्यासाठी राज्य शासनाची मान्यता लागते. पण शेवटी शिफारस ही राज्याचे पोलीस प्रमुख, मुंबईचे पोलीस प्रमुख हेच करतात. आमच्यासाठी आता वाझे हा विषय संपला आहे, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.
मुंबई पोलिसांना १०० कोटींच्या वसुलीचं टार्गेट; शरद पवार हसले
अनिल देशमुख यांनी मुंबईतील बार, नाइट क्लब आणि रेस्टॉरंट्सकडून महिन्याला १०० कोटींच्या वसुलीचं टार्गेट दिलं होतं, असा आरोप परमबीर सिंग यांनी केला आहे. तुम्हीही राज्याचं मुख्यमंत्रीपद भूषवलं आहे. खरंच असं काही टार्गेट मुंबई पोलिसांना असतं का? असा प्रश्न एका पत्रकारानं शरद पवार यांना विचारला. त्यानतंर पवार हसले आणि म्हणाले "हे तुम्ही मला काय मुंबई पोलिसांच्या कोणत्याही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला किंवा माजी अधिकाऱ्याला विचारलं तर तेही हसतील, असं पवार म्हणाले.
महाराष्ट्राच्या राजकारणाचे गुन्हेगारीकरण झालेलं आहे- चंद्रकांत पाटील
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे की, परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर जे आरोप लगावले आहेत, ते अतिशय धक्कादायक आणि निंदनीय आहेत. आता हे स्पष्ट आहे की ठाकरे सरकार भ्रष्ट आहे. त्यामुळे केवळ अनिल देशमुखांनीच नव्हे तर संपूर्ण ठाकरे सरकारने सत्तेतून पाय उतार व्हावे. चंद्रकांत पाटील यांनी पुढे म्हटलं की, महाराष्ट्राच्या राजकारणाचे गुन्हेगारीकरण झालेलं आहे हे या ठाकरे सरकारने पदोपदी सिद्ध केले. अनिल देशमुख हे सचिन वाझेंना महिना 100 कोटी रुपयांची वसुली करायला सांगायचे. पोलिसांना वसूली करायला लावणारा गृहमंत्री महाराष्ट्र कदापी सहन करु शकत नाही.