मुंबई : कोरोनाच्या संकटकाळात शिवसेनेने चांगले काम केले आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेना अपयशी ठरण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशा शब्दात महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजपवर पलटवार केला.
पराभवाच्या भीतीने पालिका निवडणुका पुढे ढकलण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप भाजप नेते आशिष शेलार यांनी केला होता. याला उत्तर देताना महापौर पेडणेकर म्हणाल्या की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळात चांगले काम केले आहे. या काळात आपल्याला कोणी वाचवले आणि कोण आपल्याला संकटात घालत आहे, हे मुंबईकर पाहतच आहेत. शिवसेना मुंबईत प्रत्येक स्तरावर काम करत आहे, हीच भाजपची पोटदुखी आहे. त्यामुळे भाजपचे नेते लोकांची दिशाभूल करत आहेत. मात्र, जीवन-मरणाचा प्रश्न होता तेव्हा आपल्यासोबत कोण होते, हे नागरिकांना चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. उत्तर प्रदेशात मृतदेह नदीत टाकले जात आहेत. तिकडे मृत्यूचे तांडव सुरू असताना भाजपच्या नेत्यांना निवडणुकीची काळजी लागली आहे, असा टोलाही किशोरी पेडणेकर यांनी लगावला.