अनामत रकमेचा परतावा घेतलाच नाही
By admin | Published: September 22, 2015 02:21 AM2015-09-22T02:21:13+5:302015-09-22T02:21:13+5:30
मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाने (म्हाडा) मे महिन्यात काढलेल्या लॉटरीमध्ये अयशस्वी ठरलेल्या सुमारे ३00 अर्जदारांची सुमारे १ कोटीची अनामत रक्कम अद्यापही म्हाडाकडेच आहे
मुंबई : मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाने (म्हाडा) मे महिन्यात काढलेल्या लॉटरीमध्ये अयशस्वी ठरलेल्या सुमारे ३00 अर्जदारांची सुमारे १ कोटीची अनामत रक्कम अद्यापही म्हाडाकडेच आहे. अनेकदा संपर्क साधूनही अर्जदारांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने ही रक्कम म्हाडाने आपल्या खात्यात जमा करून घेतली असून, अर्जदारांनी आपली ओळख पटवून दिल्यास त्यांना त्यांची अनामत रक्कम देण्यात येणार आहे.
म्हाडाच्या १ हजार ६३ घरांची लॉटरी ३१ मे रोजी काढण्यात आली. या लॉटरीत सुमारे सव्वा लाख मुंबईकरांनी अर्ज भरले होते. लॉटरीत अयशस्वी ठरलेल्या आणि प्रतीक्षा यादीवरील अर्जदारांच्या अनामत रकमेचा परतावा १५ दिवसांमध्ये तातडीने अर्जदारांच्या बँक खात्यावर करण्यात आला. परंतु अर्ज भरताना केलेल्या चुकांमुळे २ हजार ४३0 जणांची अनामत रक्कम त्यांना मिळू शकली नव्हती. त्यानंतर म्हाडाने आवाहन केल्यानंतर अर्जदारांनी म्हाडा कार्यालयात येऊन आपली
ओळख पटवून अनामत रक्कम मिळवली.
अनामत रक्कम परत करण्यासाठी म्हाडाने ३१ जुलै ही अखेरची मुदत दिली होती. परंतु त्यानंतरही सुमारे ३00 अर्जदार अद्यापही म्हाडाकडे आलेले नाहीत.
म्हाडाने या अर्जदारांना दोन वेळा एसएमएस पाठवून अनामत रक्कम नेण्याबाबत विनंती केली होती. मात्र, या अर्जदारांकडून प्रतिसाद मिळालेला नाही. अर्जदारांनी म्हाडाकडे आपली ओळख पटवून दिल्यास त्यांना अनामत रक्कम परत केली जाईल, असे म्हाडा अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, यापूर्वी काढलेल्या लॉटरीमध्ये बोगस अर्जदारांनी
अर्ज भरले होते. त्याचप्रमाणे २0१५च्या लॉटरीमध्येही अयशस्वी ठरलेले आणि अद्यापही अनामत रक्कम घेण्यासाठी पुढे न आलेले अर्जदार बोगस असल्याची
चर्चा म्हाडा वर्तुळात सुरू आहे. अधिकारी मात्र ही शक्यता नाकारत आहेत. (प्रतिनिधी)