मुंबई : मुंबईत पावसाळ्यात विजेच्या कोणत्याही समस्या उद्भवू नयेत, यासाठी एक विशेष मोहीम हाती घेतली गेली आहे. मुंबईकरांची सुरक्षा अबाधित राहावी, यासाठी अनेक उपाययोजना केल्या गेल्या असून, विजेची गळती होऊ नये, यासाठी ही दक्षता घेतली जात आहे. विजेची उपकरणे यांना शॉक लागण्याचा धोका नाही ना, यासाठी मुंबईतील विविध ठिकाणी तपासणी आणि धोका असल्यास त्याचे निवारण केले जात आहे. शिवाय प्रमुख सार्वजनिक ठिकाणी असलेल्या ५ हजार उपकेंद्रे आणि वितरण पॅनल्सची तपासणी केली जात आहे. यामध्ये सर्वसामान्य जनतेच्या संपर्कात येऊ शकतील, अशा एटीएम्स आणि लाइटच्या खांबांचाही समावेश आहे.
पावसाचे पाणी साठून विजेची समस्या होऊ नये, यासाठी सर्व वितरण आणि ग्राहक उपकेंद्रांमध्ये पुरेशा प्रमाणात डिवॉटरिंग पंप्स बसवणे. पावसाळ्यात विजेच्या उपकरणांवर झाडे पडून काही समस्या निर्माण होऊ नये, यासाठी झाडांची छाटणी करणे. उपकेंद्रांमध्ये बोटी उपलब्ध करवून देणे. आणीबाणी उद्भवल्यास त्यावरील आवश्यक कार्यवाही कमीत कमी वेळात करता यावी, यासाठी आवश्यक सुटे भाग, उपकरणे आणि साधने यांचा पुरेसा साठा करून ठेवणे. ग्राहकांना सुरक्षा उपाययोजनांची माहिती देण्यासाठी जागरूकता मोहिमांचे आयोजन, विजेच्या उपकरणांपासून लांब राहावे, ट्रान्सफॉर्मर्स आणि विजेच्या तारा यांच्याजवळ मुलांना खेळू देऊ नये, ही खबरदारी घेण्याविषयी माहिती देणे, अशा उपाययोजना केल्या जात आहेत, असे टाटा पॉवरकडून सांगण्यात आले.
विजेचा धक्का लागणे आणि अपघात हे प्रकार टाळण्यासाठी मदत म्हणून अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर (ईएलसीबी) इन्स्टॉल करणे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर पावसाळ्यात घ्यावयाच्या खबरदारीबद्दल माहिती प्रकाशित करणे. गृहसंकुलांच्या आवारामध्ये माहिती पत्रकांचे वाटप करणे. आणीबाणी निर्माण झाल्यास किंवा वीज खंडित झाल्यास कंपनीशी संपर्क साधण्यासाठी टोल फ्री क्रमांक व व्हाॅट्सॲप क्रमांकाची सुविधा आहे, अशा सर्व उपाययोजना केल्या गेल्या आहेत.
--------------------
सुरक्षित राहण्यासाठी...
- सोसाट्याचा वारा, वादळ, विजा चमकणे, जोरदार पाऊस होत असताना झाडाखाली किंवा तात्पुरत्या बांधकामाखाली आडोशासाठी थांबू नका.
- तुमच्या घराला, इमारतीला वीजपुरवठा करणाऱ्या मीटर केबिनमध्ये पाणी साठणार नाही किंवा तिथे पाण्याची गळती होणार नाही, याची पुरेपूर काळजी घ्या.
- मीटर केबिनमध्ये पाणी साचत आहे किंवा पाण्याची गळती होत आहे हे लक्षात येताच तातडीने मुख्य स्विच बंद करा. सर्व दुरुस्ती पूर्ण केली गेली आहे, हे सुनिश्चित केल्यानंतरच मुख्य स्विच सुरू करावा.
- वायरिंगमध्ये काही बदल केले गेले असल्यास परवानाधारक इलेक्ट्रिकल कंत्राटदाराकडून त्याची नीट तपासणी केली गेलेली असावी.
- विजेचे खांब, उपकेंद्रे, ट्रान्सफॉर्मर्स आणि रस्त्यांवरील दिवे यांसारख्या विजेच्या साधनांपासून लांब राहा.
- विजेची कोणतीही साधने किंवा उपकरणांजवळ मुलांना खेळू देऊ नका, त्यांना कुंपण घातलेले असेल तरी मुलांना तिथे जाऊ देऊ नका.
- विजेचा धक्का लागणे टाळण्यासाठी अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर बसवा.
- घरी एक टेस्टर ठेवा. एखादे विजेचे उपकरण ओले असेल तर त्याला फक्त टेस्टरने स्पर्श करा किंवा वीजरोधक हातमोजे, सुरक्षा पादत्राणे किंवा वीजरोधक प्लॅटफॉर्मचाच वापर करावा.