प्रलंबित पोलीस भरतीसाठी ‘एसईबीसी’ प्रवर्ग नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:15 AM2021-01-08T04:15:15+5:302021-01-08T04:15:15+5:30
२०१९ च्या जाहिरातीबद्दल गृह विभागाचा निर्णय लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : पोलीस शिपाई पदाच्या रिक्त जागांसाठी २०१९ मध्ये काढलेल्या ...
२०१९ च्या जाहिरातीबद्दल गृह विभागाचा निर्णय
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पोलीस शिपाई पदाच्या रिक्त जागांसाठी २०१९ मध्ये काढलेल्या जाहिरातीत दिलेला सामाजिक आर्थिक मागास प्रवर्ग (एसईबीसी) रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. गृह विभागाने त्याबाबत परिपत्रक जारी केले असून या प्रवर्गातील उमेदवारांचे अर्ज खुल्या प्रवर्गातून गृहीत धरण्यात येणार आहेत.
मराठा आरक्षणाच्या निकालाबद्दल सर्वोच्च न्यायालयाने गेल्या सप्टेंबर महिन्यात दिलेल्या स्थगितीच्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी आवश्यक बदल करण्यासाठी प्रत्येक घटकाने नव्याने जाहिरात देऊन उमेदवारांना बदल करण्यासाठी १५ दिवसांचा अवधी दिला जाणार आहे.
राज्य पोलीस दलातील विविध घटकांतील शिपाई पदाच्या रिक्त जागांसाठी २०१९ मध्ये जाहिरात काढली होती. त्यामध्ये एसईबीएस प्रवर्ग ठेवला होता. मात्र दरम्यानच्या काळात राज्य सरकारने मराठा आरक्षणाबद्दल दिलेल्या राखीव जागांच्या निर्णयाला स्थगिती दिली. त्यामुळे त्याला अधीन राहून ‘एसईबीसी’ प्रवर्ग रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार खुल्या प्रवर्गासाठी पात्र उमेदवारांना प्रवेश शुल्क भरण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली जाणार आहे.