Join us

पालघरमध्ये महिनाभरात एकही बालमृत्यू नाही

By admin | Published: June 14, 2017 1:58 AM

पालघर जिल्ह्यात पावसाळ्याच्या हंगामात आदिवासींना पाड्यावर जाऊन धान्य वितरण करण्यात येणार असून गेल्या महिन्याभरात मोखाड्यामध्ये एकही बालमृत्यूची

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पालघर जिल्ह्यात पावसाळ्याच्या हंगामात आदिवासींना पाड्यावर जाऊन धान्य वितरण करण्यात येणार असून गेल्या महिन्याभरात मोखाड्यामध्ये एकही बालमृत्यूची घटना झाली नाही, अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी येथे दिली. मंत्रिमंडळाच्या बैठकीदरम्यान आरोग्यमंत्र्यांनी पालघर टास्क फोर्स समितीचा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला. आॅक्टोबर २०१६ मध्ये पालघर कुपोषण निर्मुलनासाठी आरोग्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्सची नियुक्ती करण्यात आली होती. कुपोषण निर्मुलनासाठी आदिवासी विभाग, महिला व बालविकास विभाग, आरोग्य विभाग यांच्या योजनांच्या समन्वयासाठी प्रयत्न केले जात आहे, असे डॉ. सावंत यांनी यावेळी सांगितले.१५ जूनपासून २६ संवेदनशील पाड्यांना भेटी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. भेटीदरम्यान सरपंच, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्ती यांचा गट तयार करुन कुपोषित बालकांच्या संनियंत्रणाची जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. कुपोषित बालकांची माहिती देण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींचा सहभाग वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. पालघर जिल्ह्यात झालेल्या बालमृत्यूचे आॅडिट करणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.मदर चाईल्ड ट्रॅकिंग प्रकल्पाच्या माध्यमातून गरोदर माता व बालक लसीकरण सेवांचा पाठपुरावा करण्यात येत आहे.