दुष्काळाला तोंड देण्यासाठी मेहनतीला पर्याय नाही - उद्धव ठाकरे 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2019 07:47 AM2019-05-11T07:47:47+5:302019-05-11T07:49:07+5:30

धार्मिक अधिष्ठान राज्यकर्ते आणि प्रशासनाचे आत्मबल वाढवत असते. अर्थात देवाला साकडे घातले की कर्तव्य संपले असे होत नाही. त्यामुळे राजकारण बाजूला ठेवून दुष्काळ निवारणासाठी सगळ्यांनी झटणे गरजेचे आहे. 

There is no substitute for hard work to face the drought - Uddhav Thackeray | दुष्काळाला तोंड देण्यासाठी मेहनतीला पर्याय नाही - उद्धव ठाकरे 

दुष्काळाला तोंड देण्यासाठी मेहनतीला पर्याय नाही - उद्धव ठाकरे 

Next

मुंबई - महाराष्ट्रातील शेकडो गावांतील दुष्काळग्रस्त पोटापाण्यासाठी स्थलांतर करीत आहेत. त्यांना कसे रोखायचे, हा कळीचा प्रश्न आहे. कारण दुष्काळाचे संकटच भयंकर आहे. सरकार, प्रशासन यांची एकजूट व भावनेचा ओलावाच दुष्काळाशी सामना करू शकेल. पांडुरंगाचे आशीर्वाद आहेतच. त्यात मुख्यमंत्र्यांनी उज्जैनला जाऊन महांकालेश्वरासही अभिषेक घालून साकडे घातले आहे. छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्यालाही धार्मिक अधिष्ठान होतेच. तेव्हा महाराष्ट्राला धार्मिक अधिष्ठान आहेच, पण शेवटी दुष्काळाला तोंड देण्यासाठी मेहनतीला पर्याय नाही असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. सामना अग्रलेखातून उद्धव ठाकरे यांनी दुष्काळावर भाष्य केलं आहे. 

महाराष्ट्रासह देशभरात सध्या जे तीव्र पाणीटंचाई आणि दुष्काळाचे संकट घोंगावते आहे त्याचा विचार सर्वांनीच करायला हवा असंही सामना अग्रलेखातून सांगण्यात आले आहे. 

सामना संपादकीयमधील महत्त्वाचे मुद्दे  
धार्मिक अधिष्ठान राज्यकर्ते आणि प्रशासनाचे आत्मबल वाढवत असते. अर्थात देवाला साकडे घातले की कर्तव्य संपले असे होत नाही. त्यामुळे राजकारण बाजूला ठेवून दुष्काळ निवारणासाठी सगळ्यांनी झटणे गरजेचे आहे. 

वर्धा जिल्ह्यात चारापाण्याअभावी पाऊण लाख जनावरे मरणपंथास लागली आहेत व त्यात ‘गोमाता’ मोठ्या संख्येने आहेत. गाईंना कसायांच्या दारात ढकलू नये यासाठी सध्या रक्तपात होतो, पण कसायांच्या दारात न ढकलता हे गोधन कसे वाचवायचे यावर कुणीही बोलायला तयार नाही. 

जनतेला प्यायला पाणी नाही, खायला धान्य नाही, जनावरांना चारा नाही. महाराष्ट्रातला पाणीसाठा जवळजवळ संपला आहे व मुंबईसारख्या शहरालाही पाणीटंचाईच्या झळा बसण्याची शक्यता वाढली आहे. 

मुंबईच्या शेजारी असलेल्या पालघर जिह्यातील जव्हार आणि मोखाडा हे दोन तालुकेही पाणीटंचाईच्या तडाख्यात सापडले आहेत. तेथील काही गावे मुख्यमंत्री फडणवीस यांनी दत्तक घेतलेली आहेत. सध्या तिथे टँकरने पाणीपुरवठा केला जात असला तरी राज्याच्या ग्रामीण भागाची दुष्काळी दशा किती भयंकर आहे याचा अंदाज त्यावरून येतो. 

कोयनेचे पाणी कर्नाटकला देण्यास शिवसेना आमदार शंभुराजे देसाई यांनी कडाडून विरोध केला. त्यामागील वेदना समजून घेतली पाहिजे. मराठवाड्यात तर दुष्काळाची तीव्रता सगळ्यात जास्त जाणवत आहे. 

संभाजीनगर व आसपास 90 गावे पाण्याअभावी स्थलांतर करीत असल्याचे चित्र विदारक आहे. गावेच्या गावे स्थलांतरित झाली तर त्यांची पावले शेवटी शहरांकडेच वळतात. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. मुंबईवर पहिला हक्क महाराष्ट्रातील मराठी कष्टकर्‍यांचाच आहे. या कष्टकर्‍यांनीच मुंबई घडवली, 

पण मुंबईचे रक्त कुणी दुसरेच शोषत आहेत. मुंबई देशाचे पोट भरत असते. मुंबई देशाला सगळ्यात जास्त पैसा कररूपाने देते. आता दुष्काळ निवारणासाठी महाराष्ट्र केंद्राकडे हक्काने व अधिकाराने मागणी करीत आहे. 

कश्मीरातील अतिरेक्यांच्या मृत कुटुंबीयांना मदत आणि नुकसानभरपाई देणारा हा देश आहे. शेतकर्‍यांसही त्यांना जगवावेच लागेल. 
चीनमधील कारभार बंद करून 200 अमेरिकन कंपन्या म्हणे हिंदुस्थानात येणार आहेत, पण 60 टक्के उपजीविकेचे मुख्य साधन असलेला शेती हा आपल्या देशातील महत्त्वाचा उद्योग उद्ध्वस्त होत आहे. अर्थात शेती क्षेत्राची ही दैन्यावस्था गेल्या चार वर्षांत झालेली नाही. 

दशकानुदशके चुकलेल्या कृषी धोरणांचा हा परिणाम आहे आणि त्यासाठी आजवरची सगळीच सरकारे जबाबदार आहेत. त्यामुळेच दुष्काळ आणि रोजगाराचा अभाव अशा दुहेरी संकटात राज्यातील ग्रामीण जनता सापडली आहे. 

महाराष्ट्रातील शेकडो गावांतील दुष्काळग्रस्त पोटापाण्यासाठी स्थलांतर करीत आहेत. त्यांना कसे रोखायचे, हा कळीचा प्रश्न आहे. कारण दुष्काळाचे संकटच भयंकर आहे. राज्यात टँकरद्वारा पाणीपुरवठा अनेक ठिकाणी होत असला तरी तो अपुरा पडत आहे. तो वाढवण्याची आणि जनावरांच्या छावण्यांचे नियोजन अधिक काटेकोर करण्याची गरज आहे. 
 

Web Title: There is no substitute for hard work to face the drought - Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.