Join us  

रिलायन्स वीजदरवाढीचा एकदम बोजा नाही

By admin | Published: March 21, 2015 1:53 AM

मुंबई उपनगरात वीजपुरवठा करणाऱ्या रिलायन्स एनर्जी कंपनीने एकदम वीज दरवाढीचा बोजा ग्राहकांवर न टाकता टप्प्याटप्प्याने ती लागू करावी,

मुंबई : मुंबई उपनगरात वीजपुरवठा करणाऱ्या रिलायन्स एनर्जी कंपनीने एकदम वीज दरवाढीचा बोजा ग्राहकांवर न टाकता टप्प्याटप्प्याने ती लागू करावी, असे आदेश राज्य शासन महाराष्ट्र वीज नियामक आयोगाला (एमईआरसी) देणार आहे. ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानभवन परिसरात पत्रकारांना ही माहिती दिली. त्यामुळे मुंबईकरांवर एकाचवेळी दरवाढीचा बोजा पडणार नाही. रिलायन्सने वीजदरवाढीचा प्रस्ताव एमईआरसीईला दिला आहे. एवढी मोठी वाढ लागू झाल्यास मुंबईकरांवर आर्थिक बोजा पडणार आहे. ही वाढ एकाचवेळी करण्यास राज्य सरकारचा विरोध असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. एकाचवेळी वाढ लागू न करता ती टप्प्याटप्प्याने १० वर्षांत आकारावी, असे शासन सुचवेल, असे ते म्हणाले. रिलायन्स एनर्जी कंपनी वांद्रे ते मीरा भार्इंदर दरम्यानच्या २९ लाख आणि कुर्ला ते घाटकोपर पूर्व दरम्यानच्या २० लाख ग्राहकांना वीजपुरवठा करते. रिलायन्सच्या वीजदरवाढीबाबत थेट कंपनीला कोणतेही आदेश देण्याचे अधिकार राज्य सरकारला नाहीत. मात्र, २००३ च्या वीज कायद्यानुसार एमईआरसीला आदेश देण्याचा अधिकार सरकारला आहे. या अधिकाराचा वापर राज्य सरकार करेल, असे बावनकुळे म्हणाले. २००९ मध्ये राज्य शासनाने या अधिकाराचा वापर केला होता. (विशेष प्रतिनिधी)