मुंबई : लसींच्या अपुऱ्या साठ्यामुळे बऱ्याच वेळा वीकेंडच्या दिवशीच लसीकरण मोहीम बंद ठेवण्यात येते. याचा फटका या मोहिमेला बसत असतो. मात्र, यावेळेस तब्बल १ लाख ८० हजार लसींचा साठा महापालिकेला मिळाला आहे. त्यामुळे मंगळवारपर्यंत मुंबईत लसीकरण सुरळीत पार पडणार आहे.
मुंबईत १६ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. त्यानुसार आतापर्यंत ७१ लाखांहून अधिक नागरिकांना लस मिळाली आहे. ऑगस्टअखेरीस कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संसर्ग सुरू होण्याचा धोका वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे लवकरात लवकर सर्व मुंबईकरांना लस देण्याचा निर्धार पालिका प्रशासनाने केला आहे. त्यानुसार दररोज एक लाख नागरिकांना लस देणे अपेक्षित आहे.
बहुतांश वीकेंडला सुटीच्या दिवशी नागरिक लस घेण्यास प्राधान्य देतात. मात्र, लसींचा साठा अपुरा पडत असल्याने शुक्रवार, शनिवार लसीकरण मोहीम बंद ठेवण्यात येते. या काळात खासगी लसीकरण केंद्राचा आधार नागरिकांना घ्यावा लागतो. मात्र, गरीब व सर्वसामान्यांना खासगी रुग्णालयातील लस परवडणारी नसते. त्यामुळे त्यांना लस मिळण्यासाठी ही प्रतीक्षा करावी लागते.
लसींचा पुरेसा साठा उपलब्ध...
शुक्रवारी महापालिकेला १ लाख ८० हजार कोविड लसींचा साठा मिळाला आहे. रविवारी लसीकरण मोहीम बंद ठेवण्यात येते. त्यामुळे हा साठा मंगळवारपर्यंत पुरेल एवढा आहे, असे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.
* मुंबईत ९५ लाख लाभार्थी आहेत. यापैकी आतापर्यंत ७१ लाख २१ हजार ९५० नागरिकांनी लस घेतली आहे.
* त्यापैकी ५३ लाख ८६ हजार २६७ नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. तर १७ लाख ३५ हजार ६८३ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे.
* मुंबईत ११ लाख ज्येष्ठ नागरिक आहेत. यापैकी नऊ लाख ९६ हजार २८२ ज्येष्ठ नागरिकांनी पहिला तर सहा लाख १२ हजार ७३७ ज्येष्ठ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे.