ई-पासमध्ये गणपतीसाठी प्रवासाचा पर्यायच नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2020 06:16 AM2020-08-04T06:16:08+5:302020-08-04T06:16:39+5:30
कोकणवासीयांच्या परवानग्या रखडल्या; लवकरच तोडगा निघण्याची शक्यता
मुंबई : गणेशोत्सवासाठी महिनाभर आधीच मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील चाकरमान्यांची गावाकडे जाण्याची धडपड सुरू असते. यंदा कोरोनामुळे ई-पासशिवाय त्यांना गावात जाण्याची परवानगी नाही. त्यातच पोलिसांकडून देण्यात येणाऱ्या ई-पासमध्ये गणपतीसाठी प्रवासाचा पर्याय नसल्याने चाकरमान्यांची पंचाईत झाली आहे. दरम्यान, यावर लवकरच तोडगा काढण्यात येणार असल्याचे मुंबई पोलीस प्रवक्ते शहाजी उमाप यांनी सांगितले.
चाकरमान्यांनी गणपतीसाठी ई-पासचा घाट नको, अशी मागणी केली होती. शिवाय कोकणवासीयांसाठी विशेष व्यवस्था करण्यास विनंती केली होती. मात्र मुंबई पोलिसांच्या ई-पासमध्ये गणपतीसाठीचा प्रवासाचा पर्याय नसल्याने कुणालाही अद्याप परवानगी दिली नाही. तांत्रिक अडचण दूर होताच परवानगी देण्यात येईल, असे उमाप यांनी सांगितले.
एकीकडे कोकणाची वाट धरणाऱ्यांना गावी गेल्यानंतर १४ तर कुठे ७ दिवस क्वारंटाइन राहणे बंधनकारक आहे. अवघ्या काही दिवसांवर गणपतीचा सण आल्याने लवकरात लवकर ई-पास तरी द्या, अन्यथा पर्यायी व्यवस्था करा, असा सूर चाकरमान्यांमधून जोर धरत आहे.
एसटी व्यवस्था करण्याबाबत शासनाकडून निर्देश नाहीत
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे, परंतु एसटीच्या व्यवस्थेबाबत शासनाने काही खुलासा न केल्यामुळे गणेशभक्तांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. याबाबत एसटीच्या अधिकाºयांकडे विचारणा केली असता गणेशोत्सवासाठी एसटीची व्यवस्था करण्याबाबत शासनाकडून कोणतेही निर्देश आले नसल्याचे त्यांनी सांगितले.