भुजबळांनी लाच घेतली हे सुचविणारे पुरेसे पुरावे नाहीत : विशेष न्यायालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:07 AM2021-09-25T04:07:31+5:302021-09-25T04:07:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनच्या बांधकामाचे कंत्राट दिल्याप्रकरणी छगन भुजबळ व त्यांच्या नातेवाइकांना लाच देण्यात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनच्या बांधकामाचे कंत्राट दिल्याप्रकरणी छगन भुजबळ व त्यांच्या नातेवाइकांना लाच देण्यात आली, असे सुचवणारे कोणतेही पुरावे उपलब्ध नाहीत, असे निरीक्षण विशेष न्यायालयाने नोंदवत राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, त्यांचा मुलगा पंकज व पुतण्या समीर यांना महाराष्ट्र सदन आर्थिक घोटाळ्याप्रकरणी दोषमुक्त केले.
दिल्लीतील महाराष्ट्र सदनाच्या बांधकामाचे कंत्राट दिल्याप्रकरणी मेसर्स के. एस. चमणकर एंटरप्रायझेस यांनी भुजबळ यांना लाच दिल्याचा आरोप करत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एससीबी) छगन भुजबळ, पंकज भुजबळ, समीर भुजबळ व अन्य काही जणांवर गुन्हा नोंदविला. चमणकर एंटरप्रायझेसने समीर व पंकज भुजबळ संचालक असलेल्या कंपन्यांत पैसे ट्रान्सफर केले. महाराष्ट्र सदनच्या विकासकाला कंत्राट देताना बेकायदेशीर कृत्य करण्यात आले व भुजबळांना या कंत्राटाच्या बदल्यात लाच देण्यात आली, असे सुचविणारे पुरावे रेकॉर्डवर उपलब्ध नाहीत, असे न्यायालयाने निकालात म्हटले आहे.
भुजबळ यांनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कंत्राटदाराकडून लाच घेतली हे सुचविणारे रेकॉर्डवर असलेले पुरावे समाधानकारक व पुरेसे नाहीत, असे म्हणत न्यायालयाने भुजबळ व त्यांच्या कुटुंबीयांची महाराष्ट्र सदन घोटाळ्यातून दोषमुक्तता केली.
एसीबीच्या म्हणण्यानुसार, भुजबळ यांना चमणकर यांच्याकडून १३.५ कोटी रुपयांची लाच मिळाली. तर चमणकर यांना १९० कोटी रुपयांचा फायदा झाला. मात्र, असा व्यवहार झाल्याचे सिद्ध करणारे पुरावे नसल्याचे न्यायालयाने म्हटले.