Join us

उद्धव ठाकरेंच्या कामात काही उणीव नाही, पण...; स्थिर सरकारसाठी शरद पवारांची मोठी सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2020 7:47 AM

शरद पवार यांनी या मुलाखतीच्या तिसऱ्या भागामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कार्यपद्धती आणि राज्यात सत्तेवर आलेले तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थिर राहावे यासाठी काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या आहेत.

ठळक मुद्देउद्धव ठाकरे यांची काम करण्याची पद्धत ही आमच्यापेक्षा वेगळी काँग्रेस किंवा राष्ट्रवादी ज्या विचाराने वाढले आहेत. त्यात वरिष्ठांच्या मतांचा आदर केला जातो. मात्र वरिष्ठांकडून आदेशच येतो, असं होत नाहीसरकारच्या कामाच्या पद्धतीमध्ये आम्हाला कुठलीही उणीव दिसत नाही. केवळ सरकारमध्ये संवादाचा अभाव दिसत नाही

मुंबई - शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी दिलेल्या तीन भागांच्या मॅरेथॉन मुलाखतीचा तिसरा भाग आज प्रसिद्ध झाला असून, शरद पवार यांनी या मुलाखतीच्या तिसऱ्या भागामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कार्यपद्धती आणि राज्यात सत्तेवर आलेले तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थिर राहावे यासाठी काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या आहेत.

उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर भाष्य करताना शरद पवार म्हणाले की, उद्धव ठाकरे यांची काम करण्याची पद्धत ही आमच्यापेक्षा वेगळी आहे. त्याचं कारण म्हणजे उद्धव ठाकरेंच्या कामाची पद्धत ही शिवसेनेच्या कामाची पद्धत आहे, शिवसेनेच्या स्थापनेपासून मी पाहतोय की, आदेश येतो आणि आदेश आल्यानंतर त्यावर चर्चा होत नाही. मात्र काँग्रेस किंवा राष्ट्रवादी ज्या विचाराने वाढले आहेत. त्यात वरिष्ठांच्या मतांचा आदर केला जातो. मात्र वरिष्ठांकडून आदेशच येतो, असं होत नाही. एखादं मत मांडलं गेलं तर त्यावर आम्ही चर्चा करू शकतो. आमच्या कार्यकारिणीच्या कामाची ही पद्धत आहे. मात्र शिवसेनेमध्ये एकदा नेतृत्वाने भूमिका घेतली की, त्यावर अंमलबजावणी करायची ही पद्धत सर्वांमध्ये आहे. त्याच विचाराने शिवसेना चालली आहे आणि यशस्वी झाली आहे. उद्धव ठाकरे त्याच पठडीतले आहेत आणि त्यांच्या कामाची पद्धती तीच आहे. त्याबद्दल माझी काहीच तक्रार नाही.

दरम्यान, राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीमधील कुरबुरींबाबत शरद पवार म्हणाले की, महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये काही अडचण आहे, असे मला दिसत नाही. शिवसेनेसोबत आम्ही दोघेजण आहोत. मात्र आमच्या कामाची पद्धत ही शिवसेनेपेक्षा वेगळी आहे. आताचं जे सरकार आहे ते एकट्याचं नाही. हे तिघांचं सरकार आहे आणि या तिघांमध्ये काही दोघांची काही मतं असतील तर ती मतं जाणून घेण्याची आवश्यकता आहे. म्हणून आपल्यामध्ये संवाद राहिला पाहिजे, असा आमच्या लोकांचा आग्रह असतो. असा संवाद राहिला तर अशी चर्चासुद्धा होणार नाही. कारण सरकारच्या कामाच्या पद्धतीमध्ये आम्हाला कुठलीही उणीव दिसत नाही. केवळ सरकारमध्ये संवादाचा अभाव दिसतो. त्यामुळे संवाद होणे आवश्यक आहे.

टॅग्स :शरद पवारउद्धव ठाकरेशिवसेनाराष्ट्रवादी काँग्रेसमहाराष्ट्र विकास आघाडी