Join us

कोणतेही चुकीचे काम केलेले नाही - अनिल परब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मी कोणतेही चुकीचे काम केलेले नाही. त्यामुळे न्यायालयाकडून आम्हाला न्याय मिळेलच. भाजप नेते किरीट ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मी कोणतेही चुकीचे काम केलेले नाही. त्यामुळे न्यायालयाकडून आम्हाला न्याय मिळेलच. भाजप नेते किरीट सोमय्या हे निव्वळ बदनामी करण्याचे काम करत आहेत. मात्र, न्यायालयात आमचे निर्दोषत्व सिद्ध होईल, असा विश्वास परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांनी बुधवारी व्यक्त केला.

अनिल परब यांनी सोमय्या यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, कोणतेही पुरावे नसताना सोमय्या काही महिन्यांपासून माझ्यावर आरोप करत आहेत. याबद्दल मी शंभर कोटींचा दावा दाखल केला आहे. त्यांनी माफी मागावी, अशीही मागणी यात केली आहे. माझी जी बदनामी झाली ती पुसून टाकायला या याचिकेने मदत होईल. मी कोणतीही गोष्ट चुकीची केली नाही. म्हणून मी न्यायालयात दाद मागितली आहे. त्यामुळे मला नक्कीच न्याय मिळेल, असे परब म्हणाले.

किरीट सोमय्या यांनी माझ्यावर केलेले सर्व आरोप खोटे आहेत, हे लवकर सिद्ध होईल. बेछुट आरोप करून प्रतिमा मलिन करण्याचे काम त्यांनी हाती घेतले आहे. सोमय्याच न्यायाधीशाचे काम करत आहेत. तेच आरोप करतात आणि निर्णयही देतात. माझ्यावर झालेला हा अन्याय आहे. त्यासाठी मी न्यायालयात आलो आहे. इथे सर्व गोष्टी स्पष्ट होतीलच, असे सांगतानाच सोमय्या यांनी आता न्यायालयात येऊन उत्तर द्यावे, असे आव्हानही परब यांनी यावेळी दिले.

आत्मघातकी निर्णय घेऊ नका, एस. टी. कर्मचाऱ्यांना आवाहन

एस. टी. कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याचा प्रकार मंगळवारी समोर आला आहे. याबद्दल परब म्हणाले की, एस. टी. कर्मचाऱ्याने आत्महत्या केली ते दुर्देवी आहे. कर्जाच्या ओझ्याखाली आत्महत्या केल्याचे सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. आम्ही एस. टी. कर्मचाऱ्यांना पगार देण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहोत. सरकारकडून पैसे घेऊन प्रत्येक महिन्याचा पगार दिला जातोय. पगार मागे-पुढे झाले आहेत. पण, तुमचे आयुष्य खूप अनमोल आहे. त्यामुळे आत्महत्या करून आयुष्य संपवू नका. तुमचे सर्व प्रश्न सुटतील, असे परब म्हणाले.