तिकडे शिल्लक सेना; सगळ्या निवडणुका आम्हीच जिंकणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2022 07:23 AM2022-09-20T07:23:51+5:302022-09-20T07:24:22+5:30
देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंवर टीकास्त्र : कोस्टल रोडची पाहणी
लाेकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात, शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी ग्रामपंचायत निवडणुकीत ५५० पैकी ३०० पेक्षा जास्त ठिकाणी निवडून आली आहे, ही भविष्याची नांदी आहे. आम्ही सगळ्या निवडणुका एकत्रित लढविणार आहोत. सगळीकडे आमचा विजय होताना दिसेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. तिकडे शिल्लक सेना असून, खरी शिवसेना आमच्यासोबत असल्याचे म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फडणवीस यांनी चिमटा काढला.
मुंबई महापालिकेकडून बांधण्यात येत असलेल्या कोस्टल रोडची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी पाहणी केली. फडणवीस म्हणाले, ग्रामपंचायतीच्या निकालांनी शिवसेना-भारतीय जनता पार्टी युतीवर शिक्कामोर्तब केले आहे. शिंदे गट हा शिंदे गट नाही ही शिवसेना आहे; तिकडे शिल्लक सेना आहे. मुख्य सेना आमच्याकडे आली आहे. ती बाळासाहेबांच्या विचारांनी प्रेरित असलेली, त्यांच्या विचारावर चालणारी, हिंदुत्वावर चालणारी शिवसेना आहे. आम्ही एकत्रित सगळ्या निवडणुका लढविणार आहोत. कोस्टल रोड मुंबईचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. मुळात ही संकल्पना २५ वर्षे जुनी आहे. मात्र, ती संकल्पना अस्तित्वात येत नव्हती. २०१४ मध्ये आमचे सरकार आले तेव्हा मी स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे गेलो. तेव्हा आमच्या सरकारने कोस्टल रोडसाठी परवानगी मिळविली. कारण, कोस्टल रोडसाठी रिक्लेमेशन करण्यासाठी कुठलाही कायदा नव्हता. दोन वर्षे प्रयत्न केले. सर्व परवानग्या मिळविल्या. त्यानंतर काम सुरू झाले आहे. कुठल्याही परिस्थिती प्रकल्पाला विलंब होऊ नये. हा प्रकल्प वेळेत झाला पाहिजे. दोन वर्षांत जेवढे पायाभूत सेवा सुविधांचे प्रकल्प बंद पडले होते त्यांना गती देणार आहोत. आमचे सरकार हा प्रोजेक्ट पूर्ण करून दाखवणार, असे फडणवीस यांनी प्रकल्पाबाबत माहिती देताना सांगितले.
कोस्टल रोडचे काम ६२ टक्के पूर्ण
कोस्टल रोडचे सुमारे ६२ टक्के काम पूर्ण झाले आहे. पुढील वर्षाअखेरीस हा प्रकल्प पूर्ण होईल. त्यामुळे मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.