नागपूर : देशाला शांती, अहिंसा, सदाचार व बंधुभावाचा संदेश देण्याकरिता केंद्र सरकारने मुंबईतील अरबी समुद्रामध्ये भगवान महावीर यांचे भव्य स्मारक उभारावे, अशी मागणी सकल जैन समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्यसभेचे माजी सदस्य विजय दर्डा यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी या मागणीची नक्कीच दखल घेतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
विजय दर्डा यांनी रविवारी दुपारी वर्धमाननगर स्थानक येथे श्रमण संघाचे तेजस्वी युवाचार्य श्री महेंद्रऋषीजी महाराज साहेब यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. त्यांनी याप्रसंगी बोलताना ही मागणी केली. आज देशात सर्वत्र हिंसा व द्वेषाचे वातावरण आहे. महिलांवर रोज अत्याचार होत आहेत. या वातावरणात देशात भगवान महावीर यांचा अहिंसेचा विचार पेरणे आवश्यक आहे. सर्व जैन समाजाने संघटित राहावे, असे आवाहन करून समाजातील दुर्बलांना मदत करून मुख्य प्रवाहात आणण्याकरिता असे संघटन आवश्यक आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. दरम्यान, १९९४ मध्ये नागपूर येथे श्री प्रीतिसुधाजी महाराज साहेब यांच्या उपस्थितीत झालेल्या चातुर्मासाचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. जैन वगळता इतर धर्मातील सुमारे ६० टक्के नागरिक रोज या चातुर्मासात येत होते. यात हजारो नागरिकांनी मांसाहाराचा त्याग करण्याची शपथ घेतली होती, असे दर्डा यांनी सांगितले.
१९९७ मध्ये राष्ट्रसंत आचार्य श्री. आनंदऋषीजी महाराज साहेब यांनी लोकमत भवनला भेट दिल्याचा उल्लेख त्यांनी केला. त्यांच्या ‘ जगा आणि जगू द्या ‘ या संदेशानुसार आजही लोकमत वाटचाल करीत असल्याचे ते म्हणाले. कार्यक्रमात प्रवर्तक श्री. प्रकाशमुनीजी महाराज साहेब, उप-प्रवर्तक श्री. अक्षयऋषीजी म.सा., श्री. हितेंद्रऋषीजी म.सा. यांच्यासह इतर महाराज साहेब श्री. अमृतऋषीजी, श्री. दर्शनमुनीजी, श्री. गीतार्थऋषीजी, श्री. अभिनंदनमुनीजी, श्री. चंदनबालाजी, श्री. पद्मावतीजी, श्री. चारुप्रज्ञाजी, श्री. सूर्यवंदनाजी, श्री. शासनवंदनाजी, श्री. वितराग वंदनाजी, श्री. सन्मतीजी, श्री. सुचेताजी, श्री. सुप्रियाजी, श्री.सुप्रभाजी, श्री. सुबोधीजी, श्री. दिव्यज्योतीजी, श्री. दीप्तीश्रीजी, श्री. सौम्याश्रीजी, श्री. वैभवश्रीजी, श्री. काव्याश्रीजी, श्री. नाव्याश्रीजी, श्री. पियुषदर्शनाजी, श्री. रुचकदर्शनाजी,श्री. अमितज्योतीजी, श्री. अनंतज्योतीजी, श्री. अमितसुधाजी, सकल जैन फाउंडेशनचे विश्वस्त संतोष पेंढारी, महामंत्री निखिल कुसुमगर, कोषाध्यक्ष अनिल पारख, विश्वस्त मनीष मेहता आदी उपस्थित होते.
देशात भगवान महावीरांचे विचार रुजवतोय ‘ लोकमत‘‘ लोकमत ‘ हा देशातील आघाडीचा वृत्तपत्र समूह आहे. ‘ लोकमत ‘ मुळे देशामध्ये भगवान महावीर यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार होत आहे, असे श्रमण संघाचे तेजस्वी युवाचार्य श्री. महेंद्रऋषीजी महाराज साहेब यांनी सांगितले. सकल जैन समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय दर्डा यांच्यामध्ये सर्वांना सोबत घेऊन चालण्याची क्षमता आहे. त्यांची दृष्टी भविष्याचा वेध घेते. त्यांचे लेखन सर्वसमावेशक असते. ‘ लोकमत ‘ समाजाची ताकद आहे. लोकशाहीची शक्तिशाली ओळख आहे, असेही श्री. महेंद्रऋषीजी म्हणाले. नागपूर हे जैन भागवती दीक्षा महोत्सवाचे केंद्र ठरावे आणि प्रत्येक दीक्षा महोत्सव नागपूर येथेच व्हावा, असा विचार देखील मांडला.