Join us

मराठी रंगभूमीच्या वैभवाला साजेसे कलादालन व्हावे - मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 4:08 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मराठी रंगभूमीच्या वैभवाला साजेसे आणि भव्य असे कलादालन व्हावे, यासाठी यंत्रणांनी समन्वयाने प्रकल्प आराखडा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मराठी रंगभूमीच्या वैभवाला साजेसे आणि भव्य असे कलादालन व्हावे, यासाठी यंत्रणांनी समन्वयाने प्रकल्प आराखडा आणि त्यासाठीची कार्यवाही करावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी दिले. गिरगांव चौपाटी येथील बिर्ला क्रीडा केंद्राच्या पुनर्रचना प्रकल्पांतर्गत मराठी रंगभूमीचे कलादालन उभे करण्याचे नियोजन आहे. त्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा येथील समिती कक्षात आढावा बैठक झाली.

बैठकीस पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, परिवहनमंत्री अनिल परब यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी आणि नाट्य व कला क्षेत्रातील आदेश बांदेकर, सुबोध भावे, विजय केंकरे आदी उपस्थित होते. कलादानाची उभारणी करताना, त्यामध्ये नावीन्यपूर्ण अशा बाबींचा समावेश करण्यात यावा. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात यावा. कलादालनाचा परिपूर्ण प्रकल्प आराखडा, तसेच आनुषंगिक प्रस्ताव सादर करण्यात यावा, तसेच संबंधित यंत्रणांनी समन्वयाने गतीने कार्यवाही करण्याचे निर्देशही दिले.

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी गिरगाव चौपाटीवर उभारण्यात येणाऱ्या या कलादानाची इमारतही देखणी आणि वास्तुकलेची उत्तम नमुना असावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी बैठकीत मराठी रंगभूमीची वाटचाल उलगडवून दाखविणाऱ्या कला दालनाची इमारत, बाह्य व अंतर्गत रचना यांसह विविध प्रकारच्या सुविधा याबबत सादरीकरण करण्यात आले.