मुंबई : चांदीवाल समितीसमोर चौकशीला जाण्यापूर्वी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि सचिन वाझे हे एकमेकांना भेटल्याचे वृत्त समोर आले आहे. हे नियमाला धरून नाही. चौकशीला जाणारे दोन व्यक्ती वा आरोपी अशाप्रकारे भेटू शकत नाहीत, अशी नियमावली आहे तरीही ते दोघे का भेटले, कशासाठी भेटले, याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.
यासंदर्भात लोंढे म्हणाले की, परमबीर सिंह व सचिन वाझे हे दोघेही अनेक प्रकरणात आरोपी आहेत. त्यामुळे अशा पद्धतीने दोन आरोपींमध्ये चर्चा होणे गंभीर आहे. त्याने चौकशीमध्ये बाधा पोहोचू शकते. महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीची घटना कधी घडली नाही. जर अशी भेट झाली असेल तर याची खोलात जाऊन चौकशी झाली पाहिजे. सिंग आणि वाझे यांच्यामध्ये काय चर्चा झाली, त्यांच्या भेटीमागे कोण आहे, त्यात काय कट शिजला, हे जनतेच्यासमोर आले पाहिजे, असे लोंढे म्हणाले.