लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई - सोशल मीडियामध्ये इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲप असे विविध घटक येतात. लोकांना काय आवडते यावर हे सोशल मीडियाचे प्रकार असून, त्यावर त्यांची लोकप्रियता अवलंबून आहे. त्यामुळे हे एकप्रकारचे शस्त्रच झाले आहे. प्रिंट मीडियासारखे जबाबदारीने बोलणारे किंवा जबाबदारी घेणारे येथे कोणीच नसते. सोशल मीडिया झपाट्याने बदलत असून, त्याची व्याप्तीही मोठी आहे. या माध्यमाची व्याप्ती असली तरी त्यावर कोणाचे नियंत्रण नसल्याने त्यातून पसरवल्या जाणाऱ्या चुकीच्या माहितीला, अफवांना बळी पडता कामा नये. त्याबाबत सावध राहिले पाहिजे. हे एक दुधारी शस्त्रच असून, लोकप्रियता हे त्या माध्यमाच्या यशाचे गमक झाले आहे. मात्र, यावर नियंत्रणाचे धोरण असायला हवे, असे मत निवृत्त मेजर जनरल नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या स्ट्रॅटेजिक सेंटरने रविवारी आयोजित केलेल्या ऑनलाइन संवादामध्ये ते बोलत होते.
भारतातील सोशल मीडियाच्या शस्त्राला कसे रोखावे, या विषयावर स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या स्ट्रॅटेजिक सेंटरचे मानद संचालक ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी त्यांची ऑनलाइन मुलाखत घेतली. पुढे ते म्हणाले की, या लोकप्रियतेमुळे अफवा किंवा खोट्या बातम्यांना बळी पडण्याचे प्रकार घडतात. त्याला मिळणाऱ्या लाइक्सवर ही लोकप्रियता अवलंबून राहते. विचार डावा असो किंवा उजवा, त्यात सुधारणावादी विचारांना मात्र येथे स्थान नसते. लोकांची मते, दृष्टिकोन विभाजित करणे व दुही पसरवणे हीच संकल्पना येथे निर्माण झाली आहे. ही बाब सोशल मीडियाला शस्त्रासारखे स्वरूप देणारी ठरली आहे.
चीन, पाकिस्तान व युरोपातील प्रिंट व सोशल मीडियावरील बातम्या, माहिती यामुळे हे शस्त्रीकरणच चालले आहे. त्यांना योग्य उत्तर देणे व खोटेपणा उघड करणे गरजेचे आहे.
परदेशातील सामाजिक प्रसारमाध्यमांमधील प्रिंट मीडियामध्ये भारतविरोधी बातम्या प्रसिद्ध होतात. त्यांना त्यांच्या स्पर्धक माध्यमातून उत्तर देता येऊ शकते. उत्तर देण्याचे ते प्रमाण वाढवायला हवे.
चीनचेही कमकुवत घटक आहेत. त्यावर लक्ष ठेवायला हवे. त्यांचे राजकीय कच्चेदुवे आहेत. मुळात चीनच्या ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना’ या सत्ताधारी पक्षाला नियंत्रित करणारे शी जिन पिंग हे एकमेव असून, अंतर्गत विरोधकांनाही त्यांनी रोखून ठेवले आहे. त्यामुळे तेथील त्यांच्या विरोधकांना फोडणेही सोपे नाही. त्यांची टर्म दोन वेळा पूर्ण करता येते, ती आता २०२२ मध्ये पूर्ण होईल. मात्र, त्यांना पद व अधिकार सोडायचे नाहीत. अद्याप त्यांनी वारसदारही घोषित केला नाही. ते कम्युनिस्ट पार्टीचे सर्वेसर्वा झाले आहेत. त्यांनी सत्तेवर येताच भ्रष्टाचाराच्या नावाखाली विरोधकांना तुरुंगात टाकले होते.
चीनच्या आर्थिक कमकुवतपणाबाबत हेमंत महाजन यांनी विचारले असता गडकरी म्हणाले की, चीनची आर्थिक आकडेवारी नेमकी काय, ते सांगणे कठीण आहे, याचे कारण ती सर्व बाब कम्युनिस्ट पार्टी नियंत्रित करीत असते. कोरोनामुळे सर्व व्यवसायांवर ताण असून, मागणी नसल्याने ते बंदच आहेत. यातून साठा भरपूर राहिल्याने भांडवलही अडकून पडले आहे. अशा स्थितीत अर्थव्यवस्था सुधारणार नाही, मागणी वाढणे आवश्यक आहे. जीडीपी, फिस्कल डिफिसिट, परदेशी कर्जे आणि मागणी अशा सर्व आघाड्यांवर चीन पिछाडीवर असल्याचेही गडकरी यांनी स्पष्ट केले.
..................................