Join us

सर्वच ठिकाणी प्रीपेड रिक्षा-टॅक्सी व्हायला हवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2020 12:39 AM

शेखर चन्ने : प्रवाशाला चालक व प्रवासाची इत्थंभूत माहिती मिळणार, चालकांही अधिक पैसे मिळणार

मुंबई : प्रवाशांच्या सोयीसाठी आणि रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी प्रीपेड स्टॅण्ड फायदेशीर आहे़ सर्वच ठिकाणी प्रीपेड रिक्षा सुरू व्हायला हवी, असे मत परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, प्रीपेड रिक्षा-टॅक्सीमुळे प्रवाशांना प्रवासाचे साधन लवकर उपलब्ध होते. प्रीपेड वाहनचालकाची सर्व माहिती प्रवाशाला मिळते. प्रवाशांना सुरक्षित प्रवास करता येतो. रिक्षा आणि टॅक्सीचालकांना प्रीपेड स्टॅण्डमध्ये मीटरपेक्षा २५ टक्के अधिक भाडे मिळते. चालकांचाही फायदा होतो.

पुढे ते म्हणाले, मुंबईत नव्या टॅक्सींच्या छतावर दिवे लावण्यात येत आहेत. जुन्या टॅक्सीसंदर्भात टॅक्सी युनियनसोबत बैठक झाली असून ते सकारात्मक आहेत. लवकरच जुन्या टॅक्सीवर दिवे लावण्यात येणार आहेत. लोकमान्य टिळक टर्मिनस येथे शनिवारी प्रीपेड रिक्षा स्टॅण्ड सुरू करण्यात आले असताना दुसरीकडे रेल्वे स्थानकाबाहेरील एकमेव प्रीपेड टॅक्सी स्टॅण्ड बंद करण्यात आला आहे. यासाठी आरटीओ आणि रेल्वेमध्ये समन्वयाचा अभाव कारणीभूत असल्याचा आरोप स्वाभिमानी टॅक्सी-रिक्षा युनियनने केला होता.

‘रेल्वे, आरटीओ, वाहतूक पोलिसांनी सहकार्य करावे’लोकमान्य टिळक टर्मिनस येथे मेन्स टॅक्सी युनियनचे प्रीपेड टॅक्सी स्टॅण्ड सुरू होते. पण स्टॅण्डबाहेरील वाहनांमुळे प्रवाशांच्या संख्येत घट झाली. त्यामुळे हे प्रीपेड स्टॅण्ड काही दिवस बंद होते. आता प्रीपेड टॅक्सी स्टॅण्डचा परवाना नूतनीकरण करण्यात येणार आहे. प्रीपेड स्टॅण्ड सुरळीत चालण्यासाठी रेल्वे, आरटीओ आणि वाहतूक पोलिसांनी सहकार्य करावे, अशी मागणी मेन्स टॅक्सी युनियनचे नेते ए. एल. क्वाड्रॉक्स यांनी केली.

पश्चिम रेल्वेकडून प्रस्ताव नाहीप्रीपेड रिक्षा आणि टॅक्सी स्टॅण्डसाठी आरटीओ तयारी होती. पूर्वी पासून प्रीपेड टॅक्सी स्टॅण्ड सुरु होते. परंतु रेल्वेने स्टॅण्डची जागा काढून घेतली होती, जागेचे पैसे देण्याची मागणी केली होती. आरटीओने रेल्वे प्रशासनांसोबत चर्चा केली. आता रेल्वेने धोरणात बदल केला आहे. मध्य रेल्वे प्रशासन जागा देण्यास तयार झाले आहे. त्यामुळे दादर, कुर्ला, कल्याण, पनवेल आदी ठिकाणी प्रीपेड रिक्षा टॅक्सी स्टॅण्ड सुरु होणार आहे. मात्र पश्चिम रेल्वेकडून प्रीपेड स्टॅण्डसाठी कोणताही प्रस्तावआलेला नाही.