Join us

...म्हणून बाळासाहेब ठाकरे यांनी मला मुख्यमंत्री पद दिलं होतं; नारायण राणेंचा शिवसेनेवर प्रहार

By मुकेश चव्हाण | Published: October 26, 2020 4:52 PM

आतापर्यंतच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणाच्या शैलीने स्वतःची प्रतिष्ठा राखली, त्याचा काल अभाव जाणवला.

मुंबई: शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे राणे कुटुंबीयांवर टीका केली होती. उद्धव ठाकरेंनी नाव न घेता राणेंना बेडुकाची उपमा दिल्यानं आता भाजपाचे नेते नारायण राणे यांनी देखील शिवसेनेवर पलटवार केला आहे.

आतापर्यंतच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणाच्या शैलीने स्वतःची प्रतिष्ठा राखली, त्याचा काल अभाव जाणवला. निर्बुद्ध शिवराळ बरळणं म्हणजे कालचं मुख्यमंत्र्यांचं भाषण होतं, अशी टीका नारायण राणेंनी केली. तसेच कोरोनाच्या काळात घरात बसून काम करत आहे. कोणी सांगितलं तुम्हाला की वाघ आहे. पिंजऱ्यातील आहात की पिंजऱ्याबाहेरचे, असा टोला देखील नारायण राणे यांनी लगावला आहे. 

मी शिवसेनेत ३९ वर्षे होतो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मला बेडूक म्हणून नाही तर वाघ म्हणून पदं दिली. आम्ही वाघ होतो म्हणून मला मुख्यमंत्री पद दिलं होतं, असं नारायण राणे यांनी सांगितले. नारायण राणे पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. तसेच बाळासाहेबांमुळे आतापर्यंत शांत आहे. दादागिरी केलीत तर ‘मातोश्री’च्या आतलं आणि बाहेरचं सगळं बाहेर काढेन, असा इशारा देखील नारायण राणे यांनी दिला आहे.  

उद्धव ठाकरेंना जनाची नाही तर मनाची वाटली पाहिजे. मुख्यमंत्री पदाला हा माणूस लायक नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामावर बोलण्याची त्यांची लायकी नाही. काय बोलतोय हे त्यांना कळत नाही. राज्यात 16 हजार कोटींचे उद्योग आणल्याचा उल्लेख केला तो फक्त कागदावर आहे, बेकारीचा उल्लेखच नसल्याचे नारायण राणे यांनी यावेळी सांगितले.

उद्धव ठाकरेंचं भाषण वाया गेलेल्या मुलाच्या चिडलेल्या बापाच्या भाषणासारखं होतं- नितेश राणे

उद्धव ठाकरेंचं भाषण म्हणजे वाया गेलेल्या मुलाच्या थकलेल्या आणि चिडलेल्या बापाचं भाषण होतं, अशी टीका भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी केली आहे. तसेच मंत्री आदित्य ठाकरेंचं नाव आम्ही घेतलं नव्हतं, ते स्वत:च स्पष्टीकरण देत आहेत, मुलगा-वडील स्वत:च सांगत आहेत, आदित्य ठाकरे श्रावण बाळ आहे, असं टोला देखील नितेश राणे यांनी टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना ठाकरे पिता- पुत्रावर लगावला आहे. 

निलेश राणेंनी दिलं आव्हान

'नेहमीप्रमाणे दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी फालतू आणि पोकळ भाषण केलं. मराठा व धनगर आरक्षणाबद्दल एक वाक्य, पण बिहारवर २० मिनिटे. उद्धव ठाकरे धमकी कोणाला देता, आम्ही चॅलेंज देतो एका दिवसासाठी विसरा तुम्ही मुख्यमंत्री आहात आणि होऊन जाऊ दे एकदा...,' असं आव्हानच नीलेश राणे यांनी दिलं आहे. 

टॅग्स :उद्धव ठाकरेनारायण राणे भाजपाशिवसेनामहाराष्ट्र सरकार