मुंबई : भगवे फेटे घातलेले आमदार, जय भवानी, जय शिवाजी आणि भारतीय जनता पार्टी झिंदाबादच्या घोषणा आणि नवीन आमदारांमधील अपार उत्साह असे विधानभवनातील बुधवार दुपारचे चित्र होते. अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाजप विधिमंडळ पक्षनेतेपदी एकमताने निवड झाली.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी फडणवीस यांच्या निवडीचा प्रस्ताव मांडताना, राज्याला पाच वर्षे स्थिर सरकार फडणवीस यांनी दिले आणि त्यांना बदला अशी मागणी पक्षातून कोणीही केली नाही. एवढेच नव्हे तर मराठा आरक्षणासाठी झालेल्या आंदोलनातही तशी मागणी झालेली नव्हती याकडे लक्ष वेधले. ते म्हणाले की अत्यंत बाका प्रसंग असला तरी फडणवीस हे संयमाने परिस्थिती हाताळतात. हे त्यांना कसं जमतं ते मी समजून घेतोय. डोक्यात टेन्शन असले तरी त्यांच्या चेहऱ्यावर ते कधीही येत नाही. छत्रपती शिवराय, शाहू महाराजांच्या संकल्पनेतील राज्य चालविण्याचा त्यांचा निर्धार राहिला आहे.
दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा फडणवीस यांचा निर्धारपाच वर्षांत सगळेकाही करू शकलो असा माझा दावा नाही पण राज्यापुढील प्रश्न आम्हीच सोडवू शकतो, या विश्वासातून जनतेने आम्हाला पुन्हा एकदा संधी दिली आहे. आपली जबाबदारी वाढली आहे. भाजपच्या निवडून आलेल्या आमदारांमध्ये सर्व समाजांचे प्रतिनिधी आहेत. आता सगळ्यांच्या मदतीने राज्य दुष्काळमुक्त करण्याचा आपला निर्धार असल्याचे देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. छत्रपती शिवरायांचा सेवक म्हणून रयतेचे राज्य आपण चालवू. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या घटनेच्या अनुरुप आपले सरकार असेल. आपल्यासाठी संविधान हेच गीता, बायबल अन् कुराणसारखे असेल असे मुख्यमंत्री म्हणाले.1) माजी मुख्यमंत्री नारायण राणे, त्यांचे पुत्र आ.नितेश राणे, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे- आ.संतोष दानवे, आ.अरुण अडसड- आ.प्रताप अडसड या पिता-पुत्रांच्या जोड्या लक्ष वेधून घेत होत्या.2) प्रताप अडसड, गीता जैन, सचिन कल्याणशेट्टी, महेश बालदी, राजेश पाडवी, श्वेता महाले, राम सातपुते आदी पहिल्यांदा निवडून आलेल्या आमदारांना विधानभवनात पाऊल ठेवताना गहीवरून आले. त्यांच्यासह अनेक आमदारांनी विधानभवनाच्या पायरीला नमस्कार केला.3) परळीतून पराभूत झालेल्या पंकजा मुंडे, कामठीतून उमेदवारी न मिळू शकलेले चंद्रशेखर बावनकुळे यांची सगळेच आस्थेने विचारपूस करीत होते.4) फडणवीस यांच्या नेतेपदाला अनुमोदन देणाºया आमदारांनी आधी स्वत:चे नाव सांगितले. विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी आपण सहाव्यांदा विधानसभेवर निवडून आलो आहोत, अशी पुस्ती जोडली. स्वत:च्या ज्येष्ठतेचा उल्लेख करीत बागडे यांनी महत्त्वाच्या मंत्रिपदाची दावेदारी एकप्रकारे केली, अशी चर्चा आमदारांमध्ये होती.