मुंबई - Pravin Darekar on Gajanan Kirtikar ( Marathi News ) गजानन किर्तीकर यांची पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी शिवसेना उपनेते शिशिर शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून केली आहे. त्यातच मुलगा अमोल किर्तीकरांना बिनविरोध निवडून आणण्याचा कट गजानन किर्तीकरांचा होता असा मोठा दावा भाजपा नेते प्रविण दरेकर यांनी केला आहे.
भाजपा नेते प्रवीण दरेकर म्हणाले की, शिशिर शिंदे यांची भूमिका अतिशय योग्य आहे. अस्तनीतले निखारे बाळगून पक्षाला तिथे त्रास होतो. विरोधक विरोधी भूमिका घेऊ शकतो. परंतु आपल्यात राहूनच आपल्या विरोधी भूमिका घेणे हे अडचणीचे आणि घातपाताचं ठरू शकते. गजानन किर्तीकरांचा कट होता. एकनाथ शिंदेंकडून उमेदवारी मिळवायची आणि समोर अमोल किर्तीकरांना उभे करायचे. त्यानंतर जेव्हा उमेदवारी मागे घेण्याची वेळ होती तेव्हा स्वत:ची उमेदवारी मागे घेऊन मुलाला बिनविरोध निवडून आणायचे असा त्यांचा कट होता हा माझा स्पष्ट आरोप असल्याचं त्यांनी सांगितले.
तसेच एकनाथ शिंदे यांनी गजानन किर्तीकरांच्या ज्येष्ठत्वाचा मान राखला. वरिष्ठ नेते असल्याने त्यांना चांगली वागणूक दिली. परंतु गजानन किर्तीकरांचा उद्देश हा संशयास्पद होता. त्यातून आता हळूहळू ते सगळं बाहेर येताना दिसत आहे असंही भाजपा नेते प्रविण दरेकरांनी म्हटलं.
राज्यातील शेवटच्या टप्प्यातील मतदान संपताच मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाची बरीच चर्चा सुरू झाली आहे. याठिकाणी विद्यमान खासदार गजानन किर्तीकर यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. तर त्यांचा मुलगा अमोल किर्तीकर हे उद्धव ठाकरेंसोबत कायम राहिले. ठाकरे गटाकडून अमोल किर्तीकर यांना लोकसभेची उमेदवारी दिली. तर वयाचं कारण देत गजानन किर्तीकरांनी निवडणुकीतून माघार घेतली त्यामुळे महायुतीनं या मतदारसंघात रवींद्र वायकर यांना मैदानात उतरवलं होतं. मात्र मतदान संपल्यापासून सातत्याने गजानन किर्तीकर यांची विधाने समोर येत आहेत त्यातून ते अमोल किर्तीकरांच्या बाजूने असल्याचं दिसून येत असल्याने त्यांच्याविषयी स्थानिक महायुतीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.
रामदास कदम - गजानन किर्तीकर यांच्यात वाद
सुरुवातीच्या काळात शिवसेना नेते रामदास कदम आणि गजानन किर्तीकर यांच्यात उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघावरून वाद झाला होता. या मतदारसंघातून रामदास कदम यांचे चिरंजीव सिद्धेश कदम यांना उभं राहायचे होते. परंतु त्याला गजानन किर्तीकरांनी विरोध केला होता. या दोघांमधील हा वाद एकमेकांचे खासगी आयुष्य काढण्यापर्यंत विकोपाला गेला होता. त्यावेळी रामदास कदमांनीही गजानन किर्तीकरांवर संशय घेतला होता. गजानन किर्तीकर यांनी वय झाल्यानं निवडणूक लढवणार नाही असं म्हटलं. परंतु जेव्हा उद्धव ठाकरेंनी अमोल किर्तीकरांना उमेदवारी दिली तेव्हा तुम्ही लगेच जवान कसे झालात? निवडणूक लढवायला तयार कसे झालात? मग एकनाथ शिंदे यांच्याकडून तिकीट घेऊन घरी बसायचे आणि मुलाला निवडून द्यायचे असे काही नाही ना? इतका तातडीने बदल का झाला त्यासाठी अविश्वास दाखवणे नाईलाज होता. कारण तुम्ही आणि तुमचा चिरंजीव एकाच ऑफिसमध्ये बसून काम करता, तुमचा फंड तो वापरतो. मग बाप-बेटा एकमेकांसमोर उभं राहण्याचं नाटक का करताय असा सवाल रामदास कदमांनी उपस्थित केला होता.