- यदु जोशीमुंबई : राष्ट्रवादीमध्ये भूकंप घडवून आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे ‘ऑपरेशन घड्याळ’ घडवून आणले. गेल्या वर्षी एकनाथ शिंदे यांना भाजपसोबत आणण्याची किमया त्यांनी केली होती. पहाटेचा शपथविधी फसला अन् फडणवीस-अजित पवार सरकार अल्पजीवी ठरले. त्यामुळे यावेळची खेळी अंगावर येणार नाही याची पूर्ण काळजी भाजपने घेतली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि फडणवीस या चौघांमध्ये याची रणनीती ठरली. दोन महिन्यांपासून फडणवीस हे अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ यांच्या संपर्कात होते, असे सूत्रांनी सांगितले. तीन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री शिंदे व फडणवीस यांनी दिल्लीभेटीत शाह यांना सगळी कल्पना दिली.
अजित पवार यांनी शुक्रवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा सोपविला. यावेळी भाजपचा एक ज्येष्ठ नेता उपस्थित असल्याची खात्रीलायक माहिती आहे. शिंदे-फडणवीस सरकार १६५ आमदारांच्या बळावर भक्कम असतानाही अजित पवारांना भाजपने लोकसभा निवडणूक समोर ठेवून सोबत घेतल्याचा तर्क दिला जात आहे.
फडणवीस दिल्लीत जाणार का?केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार असून त्यात देवेंद्र फडणवीस यांचा समावेश केला जाईल अशी चर्चा हाेती. मात्र, खात्रीलायक सूत्रांनी सांगितले की फडणवीस केंद्रात जाण्याची शक्यता तूर्त नाही. लोकसभा निवडणुकीत ४८ पैकी किमान ४२ जागा जिंकण्यासाठी फडणवीस यांना राज्यातच ठेवले पाहिजे असा सूर भाजपमध्ये आहे. तीन पक्षांचे सरकार टिकवण्याची सर्कस करताना त्यांची मुंबईतच गरज असल्याचे समर्थनही दिले जात आहे.
शिवसेनेची बार्गेनिंग पाॅवर कमी केली भाजपने राष्ट्रवादीचा एक गट सोबत घेत मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर कमी केली. यातून एका दगडात अनेक पक्षी मारले. तिसरा भागीदार आल्याने शिवसेनेचाही वाटा कमी झाला आहे.