मलाही अडचणीत आणण्याचा प्लॅन होता; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2023 05:40 AM2023-03-17T05:40:20+5:302023-03-17T05:41:33+5:30
फॅशन डिझायनर तरुणीने पत्नी अमृता फडणवीस यांच्याशी वाढविली होती जवळीक
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : एका तरुणीने माझी पत्नी अमृता हिला एक कोटी रुपयांची लाच देऊ केली. ब्लॅकमेल केले. मलाही अडचणीत आणण्याचा प्लॅन होता, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत केला.
या प्रकरणात अमृता फडणवीस यांनी पोलिसात तक्रार दिली असल्याच्या वृत्ताकडे लक्ष वेधत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हे प्रकरण नेमके काय आहे, असा सवाल केला. त्यावर उत्तर देताना फडणवीस यांनी या ब्लॅकमेल प्रकरणाचा पर्दाफाश केला.
फडणवीस म्हणाले की, एका फॅशन डिझायनर तरुणीने माझ्या पत्नीशी जवळीक वाढविली. तिने तिच्या आईवर लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन माझ्या पत्नीच्या हस्ते करविले. विश्वास संपादन केला. येणे-जाणे सुरू केले. फॅशन डिझायनर कपडे तात्पुरते दिले. हळूच एक दिवस त्या तरुणीने सांगितले की, तिच्या वडिलांना (सात वर्षांपासून फरार) खोट्या गुन्ह्यात अडकविले आहे. तेव्हा आम्ही विरोधी पक्षात होतो. तेव्हा माझी पत्नी म्हणाली की, तू एक निवेदन त्यांना दे.
सत्तांतरानंतर त्या तरुणीने अमृताला सांगितले की, तिचे वडील सर्व बुकींना ओळखतात. आम्ही आधी बुकींबाबत माहिती द्यायचो, मग त्या आधारे पोलिसांनी छापे टाकले की दोन्हीकडून आम्हाला पैसे मिळायचे. तुम्ही मला मदत केली तर आपणही तसे छापे ‘कंडक्ट’ करू. यावेळीच माझ्या पत्नीने सांगितले की, हे आमचे काम नाही आणि अशा फालतू गोष्टी तिच्याशी करायच्या नाहीत. त्यानंतर परत तिने जवळीक वाढवायचा प्रयत्न केला. माझ्या वडिलांना सोडविण्यासाठी मी तुम्हाला एक कोटी रुपये देते, असे ती म्हणाली. माझ्या पत्नीने स्पष्टपणे नकार दिला.
तरीही ती बुकीजचा विषय काढायची. शेवटी माझ्या पत्नीने तिला ब्लॉक केले. ब्लॉक केल्यानंतर दोन दिवसांनी एका अनोळखी नंबरवरून व्हिडीओ आले. त्यात एक गंभीर व्हिडीओ होता. त्यात ती मुलगी एक बॅग आणते त्यात पैसे भरते आणि दुसऱ्या व्हिडीओत ती तशीच एक बॅग आमच्या घरी काम करणाऱ्या बाईला देत आहे. मग त्या व्यक्तीने धमक्या पाठविल्या की बघा आमच्याकडे हे असे व्हिडीओ आहेत आणि ते जर आम्ही टाकले तर तुमच्या नवऱ्याची नोकरी जाईल. माझे सगळ्या पक्षांशी संबंध आहेत. त्यामुळे तुम्ही तत्काळ आम्हाला मदतही करा. आमच्यावरील सगळे गुन्हे परत घेण्याची कार्यवाही सुरू करा. त्यावेळी मग माझ्या पत्नीने जे घडले ते मला सांगितले.
मी पोलिसांना बोलाविले. तत्काळ एफआयआर दाखल करून घेतला, पण तो सार्वजनिक नाही केला. कारण त्या मुलीचा बाप फरार होता आणि पोलिसांना वाटले की आपण आता त्याला पकडू शकू. पोलिसांनी मग नंतर आलेल्या कॉल्सचे रेकॉर्डिंग सुरू केले.
काही पोलिसांची अन् नेत्यांचीही नावे घेतली
माझ्यावरील गुन्हे परत घ्यावेत म्हणून मी तसे केले होते, पण आता तुम्ही मला मदत करा, असे म्हणत त्या माणसाने काही पोलिसांची व नेत्यांची नावे घेतली असल्याकडे फडणवीस यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.
राजकारण कुठे चालले आहे?
सर्व घटनाक्रम नमूद करून फडणवीस म्हणाले, राजकारण कुठल्या पातळीवर चालले आहे? मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला होता पण...हाती काही आले नव्हते.
फोरॅन्सिक चाचणी केली
त्या अनोळखी व्यक्तीने टाकलेल्या व्हिडिओंची फोरॅन्सिक चाचणी करण्यात आली. पैसे भरतानाची बॅग आणि दुसरी बॅग ज्यात पैसे नव्हतेच या वेगवेगळ्या असल्याचे सिद्ध झाले. एका संवादात त्या मुलीने सांगितले की, आम्ही तुमच्यासोबत (अमृता) जे काही केले ते आम्हाला सांगितले होते. आता तुम्ही आमच्यावरील गुन्हे मागे घेतले तर आम्ही उलट सांगू.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"