मुंबई मेट्रोतही होते ॲडजस्टमेंट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 09:18 AM2022-11-17T09:18:05+5:302022-11-17T09:18:33+5:30
Mumbai Metro: मेट्रोच्या गर्दीतही मुंबईकर आपला मार्ग कसा काढू शकतो, याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मेट्रोच्या मरोळ नाका स्थानकावरील एका प्रवाशाचा हा व्हिडीओ आहे.
मुंबई : मुंबई आणि गर्दी हे समीकरण नवीन नाही. विशेषतः लोकलच्या दारातून किती माणसे आत जाऊ शकतील, याचा नेमका असा काही आकडा नाही. पण लोकलचे एक बरे असते की दरवाजे स्वयंचलित नसल्यामुळे लोक एकमेकांना सांभाळून घेतात आणि प्रवास करतात. पण मुंबईत जेव्हा पहिल्यांदा मेट्रो सुरू झाली त्यावेळी लोकांनी प्रथमच स्वयंचलित दरवाजे अनुभवले. जोवर माणसे व्यवस्थित आत जात नाहीत तोवर त्याचा दरवाजा बंद होत नाही.
पण मेट्रोच्या गर्दीतही मुंबईकर आपला मार्ग कसा काढू शकतो, याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मेट्रोच्या मरोळ नाका स्थानकावरील एका प्रवाशाचा हा व्हिडीओ आहे. मेट्रोच्या गर्दीत तो स्वतःला आत कोंबायचा प्रयत्न करत आहे. तरी दार बंद होत नव्हते तेव्हा तो पुन्हा बाहेर आला आणि पुन्हा आत शिरला तेव्हा दरवाजा एकदाचा बंद झाला. वास्तविक हा व्हिडीओ तीन वर्षांपूर्वीचा आहे. गीना खोलकर नावाच्या एका व्यक्तीनेच हा शूट केला होता आणि तीन वर्षांनी पुन्हा एकदा तो शेअर केला आहे. तरीदेखील त्याला नेटिझन्सनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. ॲडजस्टमेंट हा मुंबईकरांचा स्थायीभाव आहे. मुंबई बाहेरच्या लोकांनी या व्हिडीओवरून मुंबईकरांची चेष्टा करू नये, अशा आशयाच्या प्रतिक्रिया या व्हिडीओखाली पाहायला मिळत आहेत.