Join us

पालिकेच्या नोटिसांमुळे धारावीत उडाला गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2023 11:28 AM

रहिवाशाच्या पुनर्वसनाबाबत कोणतीही स्पष्ट न देता नोटीस दिल्याने रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे.  

मुंबई : बऱ्याच वर्षांपासून घर असतानाही राहत्या घराचे पुरावे सादर करा, अशा नोटिसा पालिकेने दिल्याने धारावी राजीव गांधी नगर रहिवाशी प्रचंड गोंधळले आहेत. येथील अत्यावश्यक नागरी प्रकल्पात ज्याची घरे विस्थापित होणार आहेत. त्या रहिवाशाच्या पुनर्वसनाबाबत कोणतीही स्पष्ट न देता नोटीस दिल्याने रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे.  

पालिका जी उत्तर विभागाकडून धारावी वाॅर्ड क्रमांक १८३ मधील मिठी नदीलगतच्या ९९० झोपडीधारकांना सात दिवसांच्या आत घराची कागदपत्रे सादर करण्याची पालिका अधिनियम १८८८, कलम ३१४ ची नोटीस पाठविण्यात आली आहे. मिठी नदी विकास प्रकल्पांतर्गत मिठी नदीचे रुंदीकरण, खोलीकरण, मलनिःसारण वहिनी टाकणे, इंटरसेप्टरचे बांधकाम, संरक्षक भिंत, सेवा रस्ता बनविण्याचे काम प्रस्तावित आहे. पालिकेने हा प्रकल्प अत्यावश्यक नागरी प्रकल्प म्हणून घोषित केला आहे. त्यामुळे राजीव गांधी नगरमधील काही घरे या प्रकल्पात विस्थापित होणार आहेत. 

दरम्यान, अचानक आलेल्या या नोटिसीमुळे राजीव गांधी नगरमध्ये एकच गोंधळ उडाला आहे. पालिका आमची घरे तोडणार या विचाराने रहिवाशांची झोपच उडाली आहे. घाबरलेल्या रहिवाशांनी स्थानिक राजकीय संस्था संघटनांकडे धाव घेतली आहे. येथील शेकाप पुरोगामी विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा  साम्या कोरडे  यांनी महापालिका ‘जी’ उत्तर विभाग परिमंडळ-१ चे सहायक अभियंता राहुल जाधव यांची भेट घेतली आणि घराचे पुरावे सादर करण्याचा कालावधी वाढवावा,अशी आग्रही मागणी केली आहे. 

टॅग्स :मुंबई महानगरपालिका