पारशीवाडा हिंदू स्मशानभूमीची वायू दाहिनी बंद असल्याने अंत्यसंस्काराची होते गैरसोय
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2020 05:26 PM2020-05-29T17:26:57+5:302020-05-29T21:46:28+5:30
पालिकेच्या के पूर्व वॉर्डच्या हद्दीत येत असलेले अंधेरी (पूर्व) पश्चिम दुर्तगती महामार्गा जवळील सहार रोड येथील पारशीवाडा हिंदू स्मशानभूमी येथील वायू दाहिनी गेली १५ ते २० दिवस बंदच आहे.
- मनोहर कुंभेजकर
मुंबई : पश्चिम उपनगरात कोरोना रुग्णांच्या मृत्यूची संख्या रोज वाढत आहे. पालिकेच्या के पूर्व वॉर्डच्या हद्दीत येत असलेले अंधेरी (पूर्व) पश्चिम दुर्तगती महामार्गा जवळील सहार रोड येथील पारशीवाडा हिंदू स्मशानभूमी येथील वायू दाहिनी गेली १५ ते २० दिवस बंदच आहे. परिणामी कोरोना बाधीत मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांची मोठी गैरसोय होत आहे.
विलेपार्ले पूर्व,अंधेरी पूर्व व जोगेश्वरी पूर्व मिळून सुमारे सहा लाख लोकसंख्या असलेला पालिकेचा के पूर्व वॉर्ड आहे.काल पर्यंत के पूर्व वॉर्ड मधील कोरोना रुग्णांच्या मृतांचा आकडा हा १०२ होता. पारशीवाडा हिंदू स्मशानभूमी येथील वायू दाहिनी गेली १५ ते २० दिवस बंदच असल्याने कोरोनाग्रस्त मृतांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी ओशिवारा,सांताक्रूझ येथील विद्युत दाहिनीवर न्यावे लागत आहे. या विद्युत दाहिनीवर आधीच कोरोनाग्रस्त मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी रांगा असतात. त्यामुळे येथील विद्युत दाहिनीवर अतिरिक्त लोड येत असून मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी किमान सहा ते नऊ तास विलंब लागत असल्याचे चित्र आहे.शिवसेनेचे विलेपार्ले विधानसभा समन्वयक नितीन डिचोलकर यांनी लोकमतला ही माहिती दिली.
कोरोना बाधीत एका मृतांवर वायू दाहिनी अंत्यसंस्कार करण्यासाठी आणि ती पुन्हा पूर्ववत करण्यासाठी किमान तीन तासांचा अवधी लागतो. कोरोना बाधीत मृतांचे पूर्ण पार्थिव हे इन्फेक्टेड असून त्यांना अग्नी दिला जात नाही,तर अगदी मोजक्याच कुटुंबाच्या उपस्थितीत त्यांच्यावर वायू दाहिनीच अंत्यसंस्कार केले जातात. त्यामुळे ही सर्व बाब लक्षात घेऊन येथील विद्युत वाहिनी लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी नितीन डिचोलकर यांनी पालिकेच्या के पूर्व वार्डचे सहाय्यक आयुक्त प्रशांत सकपाळे व प्रभाग समिती अध्यक्ष सुनिल यादव यांच्याकडे केली आहे.
सहाय्यक आयुक्त प्रशांत सकपाळे यांच्याशी संपर्क साधला असंता त्यांनी सांगितले की,आपण या पूर्वीच सदर तक्रार वायू दाहिनीचे मेंटनन्स बघणाऱ्या पालिकेच्या हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर सेल यांच्याकडे केली आहे. लवकर सदर वायू दाहिनी दुरुस्त केली जाईल यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत.