जागेसाठी केला होता हट्ट, उमेदवार काही मिळेना...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2024 08:11 AM2024-04-13T08:11:31+5:302024-04-13T08:13:34+5:30
उद्धवसेनेचे अरविंद सावंत यांनी मात्र प्रचाराला सुरुवात केली आहे.
स्नेहा मोरे
मुंबई : दक्षिण मुंबई ही प्रतिष्ठेची जागा शिंदेसेनेने मोठ्या हट्टाने पदरात पाडून घेतली, असे भाजपत म्हटले जात आहे. पण, शिंदेसेनेला अद्याप आपला उमेदवार ठरविता आलेला नाही. मंत्री मंगलप्रभात लोढा आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर तयारीत असल्याचे दिसून येत आहेत. शिंदेसेनेत अद्याप सामसूम आहे. शिंदेसेनेत प्रवेश केलेले मिलिंद देवरा राज्यसभेत गेल्यानंतर उमेदवारीसाठी यशवंत जाधव यांचे नाव पुढे आले आहे. महापालिकेच्या सुरू असलेल्या चौकशीत त्यांच्या नावाची चर्चा असल्याने त्या नावावर प्रश्नचिन्ह आहे. या संपूर्ण संभ्रमावस्थेचा फायदा घेत उद्धवसेनेचे अरविंद सावंत यांनी मात्र प्रचाराला सुरुवात केली आहे.
उमेदवार जाहीर झाला नसला तरी स्थानिक भाजप पदाधिकारी - कार्यकर्त्यांकडून सावंत यांच्यावर कुरघोडी करणे सुरू झाले आहे.
या ठिकाणी मराठी, गुजराती आणि मुस्लिम मतदारांची संख्या आहे. मध्यमवर्गीयांप्रमाणेच उच्चभ्रू मतदारांनाही आकर्षित करणारा चेहरा महायुतीला शोधणे हे आव्हानात्मक आहे.
फुटीच्या राजकारणानंतर उद्धव ठाकरेंचे निर्णय, त्यांच्याप्रती असलेली सहानुभूती आणि मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर येथील लढत होणार आहे.
मुस्लिम समुदायातील मतदारांचे प्रमाण अधिक आहे, हे प्रमाण १९ टक्के आहे. हा मतदार या निवडणुकीत महायुतीला मतदान करेल, असे सकारात्मक चित्र या मतदारसंघात नाही.
या मतदारसंघात उत्तर भारतीय मतदारांचे प्रमाण १३ टक्के आहे. मनसेला महायुतीत स्थान दिल्याने त्यांच्या नाराजीची भीती.
१० टक्के प्रमाण असलेल्या गुजराती - राजस्थानी मतदारांचा कल भाजपा अथवा शिंदेसेनेच्या उमेदवाराकडे असण्याची शक्यता जास्त आहे.