शहरातील नाल्यांची सफाई झालीच नाही!
By admin | Published: June 3, 2016 02:13 AM2016-06-03T02:13:19+5:302016-06-03T02:13:19+5:30
पावसाळ्यापूर्वी हाती घेण्यात आलेली नालेसफाईची कामे वेगाने सुरू आहेत, असा दावा मुंबई महापालिका प्रशासनाने केला असला तरीदेखील मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी
मुंबई : पावसाळ्यापूर्वी हाती घेण्यात आलेली नालेसफाईची कामे वेगाने सुरू आहेत, असा दावा मुंबई महापालिका प्रशासनाने केला असला तरीदेखील मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी हा दावा सपशेल खोटा ठरवला आहे. निरुपम यांनी बुधवारी पश्चिम उपनगरातील नाल्यांची पाहणी केली असता येथील नालेसफाई झालेलीच नाही, असा आरोप त्यांनी केला आहे. निरुपम यांनी केलेल्या आरोपांमुळे प्रशासनासह सत्ताधारीदेखील तोंडघशी पडले असून, आता निरुपम यांच्या आरोपांना सत्ताधारी काय प्रत्युत्तर देतात, याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.
पश्चिम उपनगरातील सांताक्रूझ येथील वाकोला ब्रिज नाला, कालिना येथील शास्त्रीनगर नाला, सांताक्रूझ पश्चिमेकडील गजधर बांध नाला, वांद्रे येथील बेहरामपाडा विभागातील चमडावाडी नाला, वांद्रे पश्चिम येथील बोरान नाला या नाल्यांची संजय निरुपम आणि महापालिकेतील विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांनी पाहणी केली. पाहणीवेळी निरुपम म्हणाले की, येथील नाल्यांची सफाई झालेलीच नाही. नालेसफाईच्या नावाखाली सरकारी तिजोरीची सफाई सुरू आहे. नालेसफाईमध्ये महापालिकेत भ्रष्टाचार झाला आहे. सांताक्रूझ-कालिना येथील मिठी नदीमध्ये अद्याप नालेसफाई झालेली नाही. मिठी नदी ही विमानतळ प्राधिकरणाच्या क्षेत्रातून जाते. विमानतळ प्राधिकरणाने तिचा एक दरवाजा बंद केला आहे. यातून पाण्याचा निचरा होण्याचा मार्गच उरला नाही. त्यामुळे पावसाळ्यात हा परिसर जलमय होईल. वांद्रे पूर्वेकडील चमडावाडी नाल्याची पाहणी केली असता या नाल्याची सफाई झाली आहे की नाही, असा प्रश्नच पडतो, असेही त्यांनी सांगितले.
महत्त्वाचे म्हणजे गेल्या वर्षी महापालिकेने नालेसफाईच्या नावाखाली १५० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला. शिवाय या वर्षी किती कोटींचा घोटाळा केला ते मुंबई जलमय झाल्यावर कळेल आणि या पावसाळ्यात जर मुंबई पाण्याखाली गेली तर त्याला सर्वस्वी शिवसेना आणि भाजपा सरकारच जबाबदार राहील, असेही संजय निरुपम या वेळी म्हणाले. (प्रतिनिधी)