शिंदे यांना गटनेतेपदावरून हटविण्याचा ठरावच झाला नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2023 08:51 AM2023-11-24T08:51:12+5:302023-11-24T08:51:45+5:30

आमदार अपात्रता सुनावणीत शिंदे गटाचा दावा

There was no decision to remove Eknath Shinde from the post of group leader of shivsena | शिंदे यांना गटनेतेपदावरून हटविण्याचा ठरावच झाला नाही!

शिंदे यांना गटनेतेपदावरून हटविण्याचा ठरावच झाला नाही!

मुंबई : आमदार अपात्रतेच्या सुनावणीत व्हिपपाठोपाठ आता एकनाथ शिंदे यांना गटनेतेपदावरून हटविण्याचा मुद्दा कळीचा ठरला आहे. व्हिप बनावट असल्याचा दावा शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी केल्यानंतर गुरुवारच्या सुनावणीत गटनेतेपदावरून हटविण्याचा हा ठरावच झाला नसल्याचे जेठमलानी यांनी सांगितले.        

ठरावावर मंत्री उदय सामंत, संजय राठोड, दादा भुसे यांच्या असलेल्या स्वाक्षरी बनावट असून, त्यासाठी प्रतोद सुनील प्रभू यांना जबाबदार धरण्यात येईल, असेही ते म्हणाले.

आमदार अपात्रतेच्या  सुनावणीत ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची उलटतपासणी सलग तीन दिवस सुरू आहे. त्याला प्रभू हे  उत्तरे देत आहेत. व्हिपपाठोपाठ ठरावच झाला नसल्याच्या मुद्द्याला खोडून काढत वकिलांकडून सांगण्यात आले ते खोटे असल्याचे प्रभू यांनी नमूद केले.

गुरुवारी सुनावणीवेळी झालेला युक्तिवाद

जेठमलानी - व्हिप आमदार निवासात पाठवला होता का? २० जूनच्या विधान परिषद शिवसेनेच्या उमेदवाराला किती आमदारांनी मतदान केले? नेमके किती आमदारांना व्हिप प्रत्यक्षात दिले? जे आमदार तिथे नव्हते त्यांना कोणत्या मोबाइलवरून व्हिप पाठवला? व्हिप जर पक्ष कार्यालयातील कर्मचारी मनोज चौगुले यांच्या मोबाइलवरून व्हाॅट्सॲप केला तर तो तुम्ही बघितला का?

सुनील प्रभू - जे नऊ आमदार पक्ष कार्यालयात होते त्यांना तिथेच व्हिप देण्यात आला. आमदार निवासातील आमदारांना कार्यालयीन कर्मचाऱ्यांकडून व्हिप पाठविण्यात आला व त्यांची सही घेण्यात आली. सही केलेली कागदपत्रे पक्ष कार्यालयात आहेत. जे आमदार तिथे नव्हते त्यांना मनोज चौगुले यांच्या मोबाइलवरून व्हिप पाठविला. त्यांनी तो पाठविण्यात आल्याचे मला सांगितले आणि मी ते मानले. 
जेठमलानी - तुम्ही व्हिपबाबत खोटी कागदपत्र सादर केलीत. इथे आणि सर्वोच्च न्यायालयातही.
प्रभू - मी संविधानाची शपथ घेतली आहे आणि मी बोलतोय ते सत्य आहे, खोटे नाही.

ठराव बनावट असल्याचा दावा

जेठमलानी - माझ्या अशिलांना गटनेतेपदावरून हटविण्याचा ठराव कोणी तयार केला? ठरावावरील सह्या तुमच्या समोर करण्यात आल्या का? या सह्या त्यांनी केल्या तेव्हा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ते पाहिले का? 
 सुनील प्रभू - पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलावली, उपस्थित आमदारांनी ठाकरे यांना पाठिंबा दर्शविला. त्यांच्या उपस्थितीत हा ठराव केला. आमदार रवींद्र वायकर यांनी हा ठराव मांडला. माझ्या समक्ष स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. मी साक्षीदाराच्या पिंजऱ्यात आहे म्हणून तुम्ही मला गुन्हेगार ठरवत आहात. पण मी संविधानाची शपथ घेतली आहे. मी खोटे बोलणार नाही. वकिलांकडून जो दावा करण्यात आला आहे तो खोटा आहे.

Web Title: There was no decision to remove Eknath Shinde from the post of group leader of shivsena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.