मुंबई - २०१४ च्या निवडणुकीत नरेंद्र मोदीची लाट वगैरे काहीच नव्हती. नरेंद्र मोदी, अमित शाह आणि भाजप सरकारने इव्हीएम हॅक करण्याचे खूप मोठे षडयंत्र रचले होते. काही १४ ते १५ हॅकरना घेऊन त्यांना करोडो रुपये लाच देऊन हे षडयंत्र रचले आणि भाजप सरकार चुकीच्या पद्धतीने सत्तेवर आले, असा गंभीर आरोप मुंबई कॉंग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला आहे. भारतात २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत इव्हीएम हॅक करून गैरप्रकार झाल्याचा खळबळजनक दावा हॅकर सय्यद शुजा याने केला होता. ईव्हीएम हॅक केले जाऊ शकतात, असेही त्याने सांगितले होते. तसेच भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांना या प्रकारची माहिती होती. त्यामुळेच त्यांची हत्या झाल्याचा दावाही त्याने केला. तसेच आपल्या काही सहकाऱ्यांचा खून झाल्याचा आरोपही शुजा याने केला होता. या प्रकरणानंतर ईव्हीएमविरोधात मुंबई कॉंग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली मुंबई कॉंग्रेसतर्फे बांद्रा पूर्व येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. याप्रसंगी ईव्हीएमची प्रतिकृती जाळून कॉंग्रेसतर्फे निषेध करण्यात आला. त्यावेळी संजय निरुपम म्हणाले की, ''आपल्या देशात २०१४ च्या निवडणुकीत नरेंद्र मोदीची लाट वगैरे काहीच नव्हती. नरेंद्र मोदी, अमित शाह आणि भाजप सरकारने ईव्हीएम हॅक करण्याचे खूप मोठे षड्यंत्र रचले होते. काही १४ ते १५ हॅकरना घेऊन त्यांना करोडो रुपये लाच देऊन हे षड्यंत्र रचले गेले. भाजप सरकार चूकीच्या पद्धतीने सत्तेवर आलेले आहेत. ईव्हीएम मशीन हॅक करून खोटारडेपणा करून जिंकलेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सत्तेवर राहण्याचा अजिबात अधिकार नाही. संपूर्ण भारतीयांचा हा खुप मोठा अपमान आहे. देशातील जनता त्यांना कधीच माफ करणार नाही. भाजप सत्तेवर आल्यानंतर त्या १४ ते १५ लोकांपैकी काही लोकांचे खून करण्यात आले. भाजपचेच ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांना हे सगळे माहित होते म्हणून त्यांचीही हत्या करण्यात आली. हे अत्यंत खालच्या पातळीचे राजकारण आहे. याचा मी निषेध करतो.'' ''इव्हीएम मशीनवर आमचा आता अजिबात विश्वास राहिलेला नाही. “ईव्हीएम हटवा, लोकशाही वाचवा आणि मतपत्रिका (बॅलेट पेपर) पुन्हा आणा”. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आम्हाला बॅलेट पेपर पद्धतीनेच निवडणुका पाहिजे आहेत, असे निवेदन आम्ही जिल्हाधिकारी श्री सचिन कुर्वे यांना दिलेले आहे. त्यांना आम्ही विनंती केलेली आहे कि त्यांनी निवडणूक आयोगाकडे आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे आमचे निवेदन सादर करावे.
२०१४ मध्ये मोदींची लाट नव्हती, ईव्हीएम हॅक करून ते पंतप्रधान झाले, संजय निरुपम यांचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 7:52 PM